Just another WordPress site

यावल येथील महर्षी व्यास मंदीरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

येथे गुरु पौर्णिमाच्या निमित्ताने दि.३ जुलै सोमवार रोजी प्रसिद्ध असलेल्या महर्षी व्यास मंदिरात उत्सव विविध कार्यक्रमांनी मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाला सकाळपासुन दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची अलोट गर्दी व्यासांच्या दर्शनासाठी उसळली होती.यावेळी रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार रक्षा खडसे व अमोल हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते शेकडो भाविकांच्या उपस्थित भक्तीमय वातावरणात सकाळी ११ वाजेला महर्षी व्यासांची महापुजा करण्यात आली व भक्तांच्या सहकार्याने ५१ क्विंटलचे प्रसाद व ५०० लिटर गोड दुध भाविकांना वितरीत करण्यात आले.

आख्यायिकेनुसार महर्षी व्यासांनी यावलला काही काळ वास्तव्य केल्याचे आणि महाभारताचे काही पर्व येथे लिहिल्याची दंतकथा आहे.प्राचीन काळात यावलच्या उत्तरेस असलेल्या सातपुड्याचे घनदाट जंगल भुसावळच्या तापी नदीपात्रापर्यंत असल्याचे सांगितले जाते.सध्याच्या येथील हाडकाई खडकाई नद्या म्हणजेच पूर्वीच्या हरिता व सरिता होत.या नद्यांच्या संगमानंतर सूर नदी ही दक्षिणवाहिनी शहराच्या बाहेर याच नदीच्या टेकडीवर महर्षी व्यास हे सप्त चिरंजीवांपैकी एक आहेत.चिरंजीवी महर्षी व्यास आजही या भूमीत वावरत असल्याचे परिसरातील भाविकांची भावना आहे.महर्षी व्यासांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या भूमीत व्यासांचे भव्य मंदिर असल्याने दरवर्षी येथे गुरुपौर्णिमेस मोठ्या यात्रेयात्रेचे आयोजन करण्यात येते.

दरवर्षी प्रमाणे यंदा ही गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने मोठा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी परीसरातील भक्तांच्या वतीने यात्रेचे आयोजन करण्यात आले.यानिमित्ताने मंदिर व परीसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.महर्षी व्यासांच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी आपली हजेरी लावली.याशिवाय तालुक्यातील डोंगर कठोरा व टाकरखेडा या गावातील भक्तांनी मोठ्या संख्येने  पायी दिंडी काढुन व्यासांचे दर्शन घेतले.यानिमित्ताने यावल येथील महर्षी व्यास मंदिरात सकाळी आठ वाजेला महापूजेचे आयोजन करण्यात आले तर आज ११ पासून महाप्रसादाचे वाटप सकाळ पासून दिवसभर करण्यात आले.दरम्यान तालुक्यातील वड्री येथील किशोर चौधरी,डोंगर कठोऱ्याचे पंकज पाटील,धानोरा तालुका चोपडा येथील संतोष पाटील,भुसावळचे देवीदास नेमाडे यांच्या सहकार्याने भाविकांसाठी ५१ क्विंटलचा प्रसाद वितरीत करण्यात आला.प्रसंगी यावल येथील बालाजी किरानाचे मालक सचिन मिस्त्री आणि त्यांचे सहकारी पटेल टी सेन्टरचे कय्युम पटेल यांनी दर्शनार्थी भाविकांसाठी ५०० लिटर शुद्ध गोड दुधाचे मोफत वाटप केले.यावेळी शहरातील प्रमुख मार्गावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी दिसुन आली तर महर्षी व्यास व श्रीराम मंदिर विश्वस्तांनी केलेल्या आवाहनास मोठया संख्येत भाविकांनी प्रतिसाद दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.