भंडारा-पोलीस नायक(वृत्तसेवा):-भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील पिंपळगाव येथे आईसोबत घरी जमिनीवर झोपलेल्या एका सहा वर्षीय बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.लक्ष्मी जितेंद्र सुखदेवे वय 6 वर्ष रा. पिंपळगाव (निपाणी) असे मृत बालिकेचे नाव आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
रात्री नेहमीप्रमाणे लक्ष्मी आईसोबत जमिनीवर झोपली होती.मध्यरात्रीच्या सुमारास काही तरी चावल्याचा लक्ष्मीला भास झाला तिने हा प्रकार आईला सांगितला.आईने बघितले तर उजव्या पायाच्या बोटाजवळ काही तरी चावल्याचे दिसून आले.तोपर्यंत वडील जितेंद्र सुखदेवे जागे झाले. काही वेळातच लक्ष्मीचा पाय काळा पडायाला लागला.सापाने दंश केल्याची खात्री झाल्याने मुलीला तात्काळ कोंढा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले.मात्र काही वेळातच तिचा मृत्यू झाला.सकाळी या घटनेची माहिती गावात होताच अनेकांनी सुखदेवे यांच्या घरी धाव घेतली.बालिकेच्या मृत्यूने प्रत्येक जण हळहळत आहे.अड्याळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.