ठाकरे व शिंदे गटापैकी शिवसेना कुणाची ? तिढा अजुन कायम
पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठ ठरविणार निर्णय ;गुरुवारी सुनावणी
नवी दिल्ली-पोलीस नायक (प्रदेश प्रतिनिधी) :-उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटापैकी शिवसेना नेमकी कुणाची ? त्याचबरोबर बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर नेमका कोणता निर्णय द्यायचा हे आता पाच न्यायमुर्तींचा समावेश असलेले घटनापीठ ठरविणार आहे.आज झालेल्या तातडीच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रमण्णा यांनी या प्रकरणाची जबाबदारी पाच न्यायमुर्तींच्या घटनापीठाकडे वर्ग केली आहे. तसेच निवडणूक आयोगालाही गुरुवारी होणाऱ्या सुनावणीपर्यंत कोणताही निर्णय देऊ नये असे आदेश देण्यात आले आहे.या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठात नेमक्या कोणकोणत्या न्यायमुर्तींचा समावेश राहील हे सरन्यायाधीश रमण्णा ठरविणार आहे.सर्वोच्च न्यायालयात विविध मुद्यांवर वेगवेगळ्या याचिका दाखल असल्याने सर्व याचिका वेगवेगळ्या करून त्यावर रितसर सुनावणी होणार आहे. आता पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ काय निर्णय देतील याबाबत सर्व भारतीयांच्या नजरा गुरुवारी होणाऱ्या सुनावणीकडे लागल्या आहेत.