Just another WordPress site

“आता नाराजी करून काही होणार नाही फक्त त्यांना नाराज करू नये एवढेच आमचे म्हणणे” बच्चू कडू यांचा नाराजीचा सूर

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ९ मंत्र्यांचा रविवारी शपथविधी पार पडला असून अजित पवार गट राज्य सरकारमध्ये सामील झाल्यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रीमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शिंदे गट,भाजपा व अपक्ष आमदारांच्या अपेक्षांवर विरजण पडल्याचे चित्र यामुळे राज्यात निर्माण झाले आहे व त्यामुळेच शिंदे गटात नाराजी असल्याच्या चर्चा एकीकडे असताना दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांमध्येही नाराजी असल्याचे दिसून येत आहे याबाबत बच्चू कडूंनी आपली नाराजी माध्यमांकडे बोलून दाखवली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रीमंडळ विस्तार लवकर करावा अशी मागणी बच्चू कडू करत आहेत मात्र मंत्रीमंडळ विस्ताराऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच ९ आमदारांचा शपथविधी पार पडला.शिंदे गटातील आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशामुळे नाराज असल्याच्या चर्चांवर बच्चू कडूंना माध्यमांनी विचारणा करता त्यावर कडूंनी आपली भूमिका स्पष्ट करतांना म्हटले आहे की,नाराज व्हायचे कारण नाही कारण खोके म्हणणारे आता ओके झाले असून सरकार चांगले झाले असल्याने त्यांचे  स्वागतच आहे.शिंदे आणि फडणवीसांच्या वेगवान विकासाची भुरळ अजित पवारांना पडली त्यामुळे विकासात आपण मागे राहू नये यासाठी ते सरकारमध्ये सामील झाले.अजित पवार उपमुख्यमंत्री झाले त्यांचे अभिनंदनच आहे असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

तसेच बच्चू कडू पुढे म्हणाले की,जे शेवट आले त्यांना आधी जेवण मिळाले आणि आधी आलेल्यांना आता शेवट जेवण मिळणार काय माहीत. नाराज कुणी असेल तर माहीत नाही पण आता नाराजी करून काही होणार नाही फक्त त्यांना नाराज करू नये एवढेच आमचे म्हणणे आहे असे बच्चू कडूंनी नमूद केले आहे.दरम्यान याआधीही बच्चू कडूंनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे.नाराजीचा सूर असला तरी तो दाखवता येत नाही.आपलेच ओठ व आपलेच दात आणि आपलीच जीभ आहे.आता कोणासमोर बोंबलावे अशी स्थिती आहे.आता काढला ना रस्ता,आता त्या रस्त्यावर काटे आहेत वाटेत धरणे आहेत त्याला काही अर्थ नाही अशी भूमिका याआधी बच्चू कडूंनी मांडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.