Just another WordPress site

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणार

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
करोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या महाराष्ट्रातील महानगर पालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला असून येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये या निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट सूतोवाच निवडणूक आयोगाने केले आहे.
मतदार याद्यांसंदर्भात काढलेल्या अधिसूचनेमध्ये राज्य निवडणूक आयोगाने सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा उल्लेख केला आहे त्यामुळे आता या निवडणुका येत्या तीन महिन्यांत पार पडणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ५ जुलै रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी केले असून यामध्ये राज्य विधानसभेच्या मतदार याद्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरण्यासंदर्भात उल्लेख करण्यात आला आहे.दि.१ जुलै २०२३ रोजी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार याद्या सप्टेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या महानगर पालविका,नगरपरिषदा,नगरपंचायती,जिल्हा परिषदा, पंचायत समित्या,ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी वापरण्यात येतील असे अधिसूचित करण्यात येत आहे असे या अधिसूचनेमध्ये राज्य निवडणूक आयोगाने नमूद केले आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के.सूर्यकृ्ष्णमूर्ती यांच्यानावे ही अधिसूचना काढण्यात आली आहे त्यामुळे येत्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात राज्यातील सर्व प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील यावर शिक्कामोर्तबच झाले आहे त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागल्याचे दिसून येत आहे.दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या काही प्रकरणांमुळे निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आल्या नसल्याचे सांगितले जात आहे या याचिकांच्या सुनावणीनुसार तारखा जाहीर केल्या जातील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.