अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या सत्तासंघर्षाला सुरुवात झाली असून अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ‘घड्याळ’ या पक्षचिन्हावर दावा ठोकला आहे याबाबतचे पत्रही अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले आहे.अजित पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अशा आशयाचे पत्रही निवडणूक आयोगाकडे दिले आहे यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.यानंतर अजित पवार गटाकडून आज ७ जुलै शुक्रवार रोजी पत्रकार परिषद घेत बंडखोरीबाबतचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.२ जुलै रोजी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपध घ्यायच्या आधी ३० जून रोजी राष्ट्रवादीची एक बैठक पार पडली होती या बैठकीत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती यावेळी इतरही काही नेत्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.
याचवेळी अमोल मिटकरी यांची विधान परिषदेच्या प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली होती अशी माहितीही प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.३० जून २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक महत्त्वाची बैठक पार पडली ही बैठक अजित पवार यांचे निवासस्थान असणाऱ्या ‘देवगीरी’ बंगल्यावर पार पडली या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा आणि विधान परिषदेचे बहुतेक आमदार व बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.या बैठकीत सर्वांनी सर्वानुमते अजित अनंतराव पवार यांना आपला नेता म्हणून निवड केली व त्यानंतर अजित पवारांनी सर्वात आधी प्रफुल्ल पटेल म्हणजे माझी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली त्यानंतर विधानसभा अध्यक्षांना अजित पवार हे आमचे विधीमंडळाचे नेते आहेत असे मी त्यांना सूचित केले.आम्ही अनिल पाटील यांना विधानसभा प्रतोद (व्हिप) म्हणून नियुक्त केले त्याचवेळी विधान परिषदेच्या सभापतींना आम्ही कळवले की,अमोल मिटकरी यांना आम्ही विधान परिषदेचे प्रतोद म्हणून नियुक्त करत आहोत अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.