जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
१० जुलै २३ सोमवार
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले त्यानंतर आता अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंडखोरी केल्याने दोन गट पडले आहेत तसेच काँग्रेसचेही अनेक आमदार खासदार फुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.काँग्रेसचे अनेक आमदार भाजपात जाण्यास इच्छुक असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे दरम्यान अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री अनिल पाटील यांनीही याबाबत मोठा दावा केला असून ते जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.अनिल पाटील म्हणाले की,काँग्रेसचे अनेक आमदार,नेते,पदाधिकारी,माजी आमदार-खासदार अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या संपर्कात आहेत.येणाऱ्या काळात हे संपर्कात असलेले काँग्रेसचे आमदार आणि खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील असे अनिल पाटील यांनी म्हटले आहे.
आमची सर्व दारे खुली आहेत कोणत्याही नेत्याला आम्ही आहे त्या पद्धतीने मान सन्मान देऊ व जो नेता अजितदादा यांच्यासोबत काम करणार असेल त्याचे आम्ही घरी जाऊन स्वागत करू.आजही जे नेते इकडे तिकडे असतील किंवा संभ्रमावस्थेत असतील त्यांना हात जोडून विनंती की त्यांनी एक संघ व्हावे.गल्लीपासून दिल्लीतील नेत्यापर्यंत आमचे आवाहन असून यामध्ये एकनाथ खडसे,गुलाबराव देवकर,माजी मंत्री सतीश पाटील सुद्धा आहेत या सर्वांनी अजित पवार यांच्यासोबत पक्ष संघटन करावे अशी विनंती अनिल पाटील यांनी यावेळी केली.ते पुढे म्हणाले की, जे जे लोक आज अजित पवार यांच्यासोबत नसल्याचे दाखवत आहेत त्यांचे आम्हाला मागून पुढून संपर्क चालू आहेत त्यामुळे आमच्यासोबत जळगाव जिल्ह्यातील १०० टक्के कधी होतील याचा भरोसा नाही असा दावाही अनिल पाटील यांनी केला आहे.