“सरकारमधील तीन इंजिनमुळे सरकार मजबूतही होऊ शकते आणि बिघाडही होऊ शकतो” बच्चू कडू यांचे वक्तव्य
नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
१२ जुलै २३ बुधवार
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला तसेच राष्ट्रवादीच्या बंडखोर अजित पवार गटातून ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र अद्यापही त्यांचा खातेवाटप झालेला नाही.याशिवाय आधीच मंत्रिपदासाठी आस लावून बसलेले शिंदे गट आणि भाजपातील आमदारही नाराज असल्याची चर्चा होत आहे अशातच सत्ताधारी पक्षाचे बहुतांश आमदार मुंबईत आल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत.या पार्श्वभूमीवर सर्व आमदार मुंबईले गेले असताना अपक्ष आमदार आणि प्रहारचे प्रमुख बच्चू कडू नागपूरमध्ये असल्याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की,माझी कार्यकर्त्यांबरोबर बैठक आहे तसेच उद्या पारधी मेळावाही आहे.मुंबईत राहिले तर मंत्रीपद मिळते आणि गावी राहिले तर मिळत नाही असे नाही.शेवटी मंत्री असो अथवा नसो काम तर करावेच लागते परिणामी कामासाठीच मी परत आलो असून सध्या खातेवाटपाचा गोंधळ सुरू असेल.सरकारमध्ये तीन इंजिन आहेत त्यामुळे सरकार मजबूतही होऊ शकते आणि बिघाडही होऊ शकतो असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले आहे.
तीन इंजिनमुळे बिघाड होऊ नये म्हणून मुंबईत बैठका सुरू असतील.या सगळ्या अचानक झालेल्या घटना असल्याने यात नकळतपणे अनेक गोष्टी समोर येत आहेत त्यामुळे त्यात थोडा चिंतेचा विषय आहेच.कुणाला कोणते खाते द्यायचे,कोणत्या जिल्ह्याला कुणाला पालकमंत्री करायचे या अनेक भानगडी आहेत या दिसतांना सोपे वाटते परंतु आतून आम्ही पाहतो तेव्हा सर्व पोखरलेले असते.तुम्हाला कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची अपेक्षा आहे?” या प्रश्नावर बच्चू कडू म्हणाले,मला कोणतीही अपेक्षा नाही जशी परिस्थिती येईल त्यात आम्ही मार्गक्रमण करत असतो व मी अपेक्षा ठेऊन कधी चालत नाही.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मंत्रीपदाबाबत गेल्या दोन-तीन दिवसात मला कोणताही फोन आलेला नाही असे मत बच्चू कडूंनी व्यक्त केले आहे.सत्ताधारी पक्षाचे ९० टक्के आमदार मुंबईत आहेत हाच बच्चू कडू आणि इतर आमदारांमधील फरक आहे.इतके आमदार सांभाळताना नाराजी तर होणारच आहे तसेच प्रत्येकाची वेगवेगळी अपेक्षा असते परिणामी सगळेच आनंदी आहेत असे नाही.विरोधी पक्षातही सगळे आनंदी नाहीत आणि सत्ताधारी पक्षातही सगळे आनंदी नाहीत त्यामुळे सगळे सुखी राहतील असा सुखी माणसाचा सदरा अद्याप तरी आलेला नाही असेही बच्चू कडू यांनी नमूद केले आहे.