Just another WordPress site

लाच स्वीकारण्यास संमती दिल्याप्रकरणी लाचखोर सहायक फौजदाराविरूध्द गुन्हा दाखल

दि.१२ जुलै २३ बुधवार
एका तक्रारी अर्जानुसार कोणताही गुन्हा दाखल न करण्यासाठी स्वतःसाठी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकासाठी पाच लाख रूपयांची लाच मागून त्यापैकी तीन लाख रूपयांची लाच स्वीकारण्यास संमती दिल्याप्रकरणी शहरातील एका सहायक फौजदाराविरूध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील घटनेमुळे पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.संजय मनोहर मोरे (वय ५७) असे संशयित लाचखोर सहायक फौजदाराचे नाव असून त्याची नेमणूक विजापूर नाका पोलीस ठाण्यात होती.या प्रकरणात तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे-पाटील यांचेही नाव समोर आले असून त्यामुळे त्यांचीही चौकशी होणार आहे अशी सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे.
एका तक्रारी अर्जाची चौकशी सहायक फौजदार मोरे याच्याकडे होती.ज्याच्या विरूध्द तक्रार होती त्या व्यक्तीला संजय मोरे याने बोलावून घेतले आणि तक्रारी अर्जानुसार गुन्हा दाखल करण्याची भीती दाखविली तेव्हा संबंधित व्यक्तीने गयावया करून गुन्हा दाखल करू नये म्हणून विनवणी केली तेव्हा तक्रारी अर्जाच्या चौकशीत सहकार्य करून कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच पोलीस ठाण्यात आणून जमा केलेली पिकअप व्हॅन गाडी सोडण्यासाठी सहायक फौजदार संजय मोरे याने पाच लाख रूपयांची लाच मागितली.सदरील लाच मोरे याने स्वतःसाठी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनपुडे-पाटील यांच्यासाठी मागितल्याचे निष्पन्न झाले असून त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयातील सहायक पोलिस आयुक्त गणेश कुंभार यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात सहायक फौजदार संजय मोरे याच्याविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.या कारवाईत पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, चंद्रकांत कोळी,हवालदार शिरीषकुमार सोनवणे,अतुल घाडगे,स्वामीराव जाधव,सलीम मुल्ला यांच्या पथकाने भाग घेतला.
Leave A Reply

Your email address will not be published.