Just another WordPress site

“मी अजित पवारांना समर्थन दिले आहे याचा अर्थ मी भाजपाचा प्रचारक असेल किंवा भाजपा सत्तेवर येण्यासाठी मी प्रयत्न करेन असे नाही” अमोल मिटकरी यांचे विधान

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ जुलै २३ बुधवार

अजित पवारांसह ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे व सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.परंतु अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यानंतर मंत्रीपद आणि विधानसभा-लोकसभेच्या जागांवरुन महायुतीतील पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे.दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा सत्तेत आणण्यासाठी आपण भाजपाला पाठिंबा दिला असे वक्तव्य अजित पवारांनी केले आहे तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ९० जागांवर निवडणूक लढवणार आहे असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.परंतु अजित पवार गट महायुतीत सामील झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार करणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.यावर अजित पवार समर्थक आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.मी अजित पवारांना समर्थन दिले आहे याचा अर्थ मी भाजपाचा प्रचारक असेल किंवा भाजपा सत्तेवर येण्यासाठी मी प्रयत्न करेन असे नाही अशी प्रतिक्रिया मिटकरींनी दिली ते ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

आगामी निवडणुकांमध्ये जेव्हा महायुतीची एकत्रित सभा होईल तेव्हा तुम्ही भाजपाचा प्रचारक म्हणून सभा घेणार का? असा सवाल विचारला असता अमोल मिटकरी म्हणाले की,विधानसभेच्या ९० जागांवर जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा असेल तिथे मी प्रचार करणार असून  भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार करणे माझ्यावर बंधनकारक नाही.अमोल मिटकरी हा महाराष्ट्रातला पुरोगामी चळवळीतला एक कार्यकर्ता असून त्याने त्याची विचारधारा आजपर्यंत जोपासली व त्या विचारधारेचा सन्मान म्हणून मी आज आमदार पदावर आहे परिणामी ती विचारधारा मी कधीही सोडणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.अजित पवार हे माझे नेते आहेत त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतलाय त्याचे मी समर्थन केले आहे.मात्र याचा अर्थ असा नाही की मी भारतीय जनता पार्टीचा प्रचारक असेल किंवा भाजपाचे सरकार यावे यासाठी मी प्रयत्न करेन असे कधीही होणार नाही असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी भाजपाला पाठिंबा दिला असे  अजित पवारांनी स्वत: सांगितले आहे.तुम्हीही त्यांच्याच पक्षातील आहात मग भाजपाला निवडून येण्यासाठी मदत करणार नाही असे कसे म्हणू शकता? असे विचारले असता मिटकरी पुढे म्हणाले की,ते अजित दादांचे वैयक्तिक मत आहे ते माझे वैयक्तिक मत नाही असे अमोल मिटकरी यांनी नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.