राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी अजित पवारांचे बंड,सरकारमध्ये सहभाग,मंत्रीपदाची शपथ,रखडलेले खातेवाटप आणि मंत्रीमंडळ विस्तार यावरून मोठे विधान केले असून भाजपाचे अनेक आमदार नाराज असल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केला आहे तसेच भाजपा आमदार माझ्याशी बोलतांना या निर्णयामुळे नाखूश असल्याचे सांगत असल्याचे एकनाथ खडसे यांनी नमूद केले आहे ते आज दि.१४ जुलै शुक्रवार रोजी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.एकनाथ खडसे म्हणाले की,शिंदे गटाचे अनेक आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून मंत्रीपदासाठी उभे आहेत तसेच अनेक आमदार स्वतःहून सांगत आहेत की,मी मंत्री होणार आहे,मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला.काही म्हणत आहेत की,मी मंत्री होणार,मी पालकमंत्री होणार आहे अशा स्थितीत प्रत्येकजण मंत्रीपदासाठी इच्छूक आहेत.ज्यावेळी मंत्रीमंडळ विस्तार होईल,खातेवाटप होईल तेव्हा मोठ्या प्रमाणावर नाराजी उफाळणार आहे.आज भाजपाच्या आमदारांमध्येही नाराजी आहे.भाजपा आमदारांमध्ये नाराजी आहे फक्त शिंदे गटाप्रमाणे बाहेर बोलत नाहीत परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेतल्याने भाजपाचे अनेक आमदार नाराजी व्यक्त करत आहेत असा दावा एकनाथ खडसेंनी केला आहे.
भाजपा आमदार माझ्याशी बोलताना या निर्णयामुळे नाखूश असल्याचे मलाही सांगतात त्यामुळे याचा परिणाम आज नाही तर उद्या होईल मात्र निश्चित होईल तो परिणाम या पक्षांसाठी अनुकुल नसेल असा इशारा एकनाथ खडसेंनी दिला आहे.