Just another WordPress site

आमदारांच्या अपात्रतेबाबत दोन आठवड्यांत उत्तर सादर करावे,सर्वोच्च न्यायालयाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ जुलै २३ शुक्रवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य शिवसेना आमदारांविरोधात अपात्रतेच्या प्रलंबित नोटिशींवर तातडीने निर्णय घेण्याचा निर्देश द्यावेत अशी मागणी करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यावर आज दि.१४ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. तेव्हा दोन आठवड्यांत आपले उत्तर सादर करावे अशी नोटीस सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना बजावली आहे.२१ जून २०२२ रोजी शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिंदे गटातील आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिल्या होत्या त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात रंगलेल्या सत्तासंघर्षांवर ११ मे २०२३ रोजी पाच सदस्यांच्या घटनापीठाने ऐतिहासिक निकाल दिला होता यात  आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभाध्यक्षांनी योग्य कालावधीत घ्यावा असे निर्देश देत घटनापीठाने दिले होते.

मात्र हा आदेश देऊन दोन महिने झाल्यानंतरही नार्वेकर यांनी आमदारांच्या पात्रतेसंदर्भात एकही सुनावणी घेतली नसल्याचे सुनील प्रभू यांनी याचिकेद्वारे निदर्शनास आणून दिले आहे.सुनावणी घेण्यासंदर्भात १५ मे,२३ मे व २ जून अशी तीन वेळा विनंती केली होती.विधानसभाध्यक्षांनी या विनंतीची दखल घेतली नाही त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयानेच यासंदर्भात निर्देश द्यावेत अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. यावर आज दि १४ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.दोन आठवड्यांत विधानसभा अध्यक्षांनी आपले उत्तर सादर करावे अशी नोटीस बजावण्यात येत आहे असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटले आहे.नबाम रेबिया प्रकरणात विधानसभा अध्यक्षांचा निवाडा निष्पक्ष असावा असे न्यायालयाने म्हटले होते तर २०२० मधील कैशाम मेघचंद्रसिंह विरुद्ध मणिपूर विधानसभा अध्यक्ष या खटल्यात अपात्रतेची याचिका दाखल झाल्यापासून साधारणत: तीन महिन्यांमध्ये निकाल दिला जावा असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.सुनील प्रभू यांच्या याचिकेत या पूर्वीच्या निवाड्यांचे संदर्भ देण्यात देण्यात आले होते त्याआधारे नार्वेकर यांना तातडीने सुनावणी व निकालाचे आदेश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.