मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ जुलै २३ शुक्रवार
राष्ट्रवादीत बंड करून भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला वित्त,सहकार,कृषी,महिला व बालकल्याण यासारखी महत्त्वाची खाती वाट्याला आली आहेत.शपथविधीनंतर तब्बल १३ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले.राष्ट्रवादीत बंड करणाऱ्या अजित पवार यांच्या गटाने चांगली खाती मिळावीत अशी मागणी केली होती.भाजपने अजित पवार यांच्याशी पाठिंब्याच्या वाटाघाटी केल्या तेव्हाच त्यांच्याकडील कोणती खाती सोडणार याचे आश्वासन दिले होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटाकडे असलेली महत्त्वाची खात सोडण्यास नकार दिला होता यातून गेले आठवडाभर खातेवाटपाचा घोळ सुरू होता. शेवटी प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांना मध्यस्थीसाठी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे धाव घ्यावी लागली होती यानंतरच खातेवाटपाचा तिढा सुटला.अजित पवार यांच्याकडे वित्त खाते सोपविण्यास शिंदे गटाच्या आमदारांनी विरोध दर्शविला होता कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेच्या आमदारांची निधीवरून अजित पवार यांच्या विरोधात नाराजी होती.शिंदे यांच्या बंडाला निधी वाटपाचे कारणही जबाबदार होते.राष्ट्रवादीत बंड करतानाच अजित पवार यांना भाजपच्या नेतृत्वाने वित्त खात्याचे आश्वासन दिले होते यामुळेच शिंदे गटाने विरोध करूनही वित्त खाते हे अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.सहकार हा राष्ट्रवादीचा मूळ पाया आहे यामुळे सहकार खात्याची मागणीही मान्य झाली आहे.
राष्ट्रवादीच्या वाट्याला वित्त,सहकार,कृषी,मदत व पुनर्वसन,अन्न व नागरी पुरवठा,वैद्यकीय शिक्षण,महिला व बालकल्याण ही महत्त्वाची खाती आली आहेत.खांदेपालटानंतर शिंदे गटाकडे नगरविकास,उद्योग,परिवहन,सामाजिक न्याय,शालेय शिक्षण,रस्ते विकास,उत्पादन शुल्क ही खाती कायम राहिली आहेत.लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत महत्त्वाची सहकार,कृषी,मदत व पुनर्वसन,वैद्यकीय शिक्षण अशी खाती राष्ट्रवादीकडे गेली आहेत.शिंदे गटाला राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसाठी आपल्याकडील कृषी,मदत व पुनर्वसन आणि अन्न व औषध प्रशासन ही खाती सोडावी लागली आहेत.भाजपने वित्त,सहकार,अन्न व नागरी पुरवठा,वैद्यकीय शिक्षण,महिला व बालकल्याण आदी खाती राष्ट्रवादीसाठी सोडली आहेत.यात खात्यांवर नजर टाकल्यास शिंदे गटाच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे महत्त्वाची खाती वाट्याला आली आहेत.