“अजित पवार यांना अर्थ खाते दिले तरी त्यांच्या निर्णयावर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा असेल” – दीपक केसरकर यांची स्पष्टोक्ती
पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ जुलै २३ शनिवार
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली तसेच अन्य आठ प्रमुख नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली. आज मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला असून त्यात अर्थमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आले तसेच शिवसेनेकडे असलेली काही महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली त्यामुळे शिवसेनेचे महत्त्व कमी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.या पार्श्वभूमीवर पुण्यात एका कार्यक्रमासाठी आलेले शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत स्पष्टीकरण दिले असून राजकीय परिस्थिती पाहून सरकारमध्ये निर्णय घेतले जातात.उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खाते दिले तरी त्यांच्या निर्णयांवर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा असेल असे अजितदादांनीच अनेकदा स्पष्ट सांगितले आहे त्यामुळे अर्थ खात्याची शिवसेनेला काळजी नाही.आधीच्या सरकारमध्ये काय नाराजी होती हे अजितदादांनी समजून घेतले आहे त्यामुळे अर्थमंत्री म्हणून अजितदादा सर्वांना न्याय देतील याची खात्री आहे असे केसरकर यांनी सांगितले.
अब्दुल सत्तार यांच्याकडे असलेले कृषि खाते राष्ट्रवादीला दिल्याबाबतच्या प्रश्नावर केसरकर म्हणाले की,अब्दुल सत्तार यांनी कृषीमंत्री म्हणून चांगले काम केले.शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देण्यात आले.सत्तार यांच्याशी बोलूनच मुख्यमंत्र्यांनी कृषि खाते राष्ट्रवादीला दिले.संजय राठोड यांच्याशी चर्चा करूनच खाते बदल करण्यात आले त्यामुळे नाराजीचा प्रश्नच येत नाही.महाविकास आघाडी सरकारमध्ये मी चांदा ते बांदा ही योजना आणली या योजनेला अर्थखात्याकडून निधी मिळाला नाही.तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अर्थमंत्र्यांशी चर्चा केली असती तर योजनेला निधी मिळाला असता.आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वांना वेळ देत आहेत सर्वांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी चांगले काम केले आहे त्यामुळे तीन पक्षांचे सरकार उत्तम कारभार करेल असे केसरकर यांनी म्हटले आहे.