“राजकीय विरोधक आणि टीकाकार यांनाच कायदा व तपास यंत्रणांचा धाक असला पाहिजे हेच या सरकारचे एकमेव धोरण”ठाकरे गटाचा केंद्रावर हल्लाबोल
जागतिक गुन्हेगारीमध्ये देशाच्या यादीत भारताचा ८१ वा क्रमांक असून १४४ देशांच्या या यादीत भारत ८१ व्या तर पाकिस्तान ८५ व्या क्रमांकावर आहे म्हणजेच पाकिस्तान भारतापेक्षा अधिक सुरक्षित असल्याचा दावा या जागतिक गुन्हेगारी देशाच्या यादीतून करण्यात आला आहे यावरून ठाकरे गटाने केंद्र सरकारला लक्ष्य केले असून सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाने मोदी सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे.हिंदुस्थान सर्वच क्षेत्रांत कशी घोडदौड करीत आहे याच्या सुरस आणि रम्य कथा समाजमाध्यमांवरून पसरविल्या जात असतात. मोदी राजवटीचे अंधभक्त आणि पगारी सायबर फौजा हे काम चोखपणे पार पाडत असतात मात्र प्रत्यक्षात अनेक बाबतीत हिंदुस्थान कसा पिछाडीवर आहे आणि नको त्या गोष्टींत कसा आघाडीवर आहे याचे जागतिक आकडे वेळोवेळी या दाव्यांची पोलखोल करीत असतात. आताही जगातील भीतिदायक आणि गुन्हेगारी अधिक असलेल्या देशांची एक यादी जाहीर झाली आहे त्यात आपला देश ४४.४३ टक्के गुन्हेगारीसह ८१ व्या क्रमांकावर आहे.८१ वे स्थान हे बरेच ‘वरचे’ दिसत असले तरी १४४ देशांच्या यादीतील हे स्थान लक्षात घेतले पाहिजे अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.जर मोदी सरकार आल्यापासून देश खरंच प्रगतीपथावर गेला असेल तर मग हा क्रमांक ८१ ऐवजी त्यापेक्षा खूप पुढे असायला हवा होता मात्र तसे झालेले नाही.कसे होणार? सरकार आणि त्यांचे भगतगण कितीही ढोल पिटत असले तरी देशातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झालेले नाही हे वास्तव आहे.रोज देशाच्या कानाकोपऱ्यांतून येणाऱ्या गुन्हेगारीच्या बातम्या या भयंकर वास्तवाची जाणीव करून देत असतात.खून,हल्ले,लूट,दरोडे,चोरी,स्त्री अत्याचार वाढतानाच दिसत आहेत हे काही भक्त मंडळी म्हणतात तसे गुन्हे आणि भयमुक्त तसेच सुरक्षित देशाचे लक्षण नाही असाही हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.
आपल्यापेक्षा तो पाकिस्तान दोन टक्क्यांनी का होईना पण ‘सुरक्षित’ ठरला आहे कारण याच यादीत हिंदुस्थानचा ८१ वा तर पाकिस्तानचा ८५ वा क्रमांक आहे.तेथील गुन्हेगारी आपल्या ४४.४३ टक्क्यांच्या तुलनेत कमी म्हणजे ४२.८ टक्के आहे म्हणजे ज्या पाकिस्तानच्या नावाने शिमगा केला जातो,इशारे,नगारे वाजविले जातात त्या पाकिस्तानात गुन्हेगारीचा दर दोन टक्क्यांनी का असेना आपल्यापेक्षा कमी आहे.तरीही मोदी सरकारच्या काळात आपला देश सुरक्षित आणि भयमुक्त झाल्याचा डिंडोरा पिटणाऱ्यांना काय बोलणार? असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.भक्त मंडळींना कदाचित हे ८१ वे स्थानदेखील गैर वाटणार नाही.४४ टक्के गुन्हेगारी म्हणण्यापेक्षा ५६ टक्के देश विद्यमान राजवटीत कसा ‘सुरक्षित’ आहे याचे ढोल पिटले जातील! मोदी सरकार म्हणजे धाक,जरब असे सांगितले जाईल मात्र वस्तुस्थिती तशी आहे का? तर नाही. तसे असते तर देशातील गुन्हेगारी वाढली नसती कर्जबुडव्यांची संख्या कमी झाली असती ते देशाबाहेर पळून जाऊ शकले नसते असे टीकास्र या माध्यमातून डागण्यात आले आहे.भ्रष्टाचार हा ‘शिष्टाचार’बनला नसता.भ्रष्टाचारी मंडळी भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये ‘धुतल्या तांदळा’ सारखे होत भाजपसोबत सत्तेत सहभागी झाली नसती.खरे म्हणजे मोदी सरकारला तरी खऱ्या गुन्हेगारांना कायदा आणि तपास यंत्रणांची भीती वाटावी असे खरंच वाटते का? हा प्रश्नच आहे कारण फक्त आपले राजकीय विरोधक आणि टीकाकार यांनाच कायदा व तपास यंत्रणांचा धाक असला पाहिजे हेच या सरकारचे एकमेव धोरण आहे.केंद्रीय तपास यंत्रणांचा दहशतवाद त्यासाठीच तयार केला गेला आहे.लोकशाहीचे सर्व स्तंभ याच दहशतवादी पंजाखाली घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.विद्यमान केंद्र सरकारचा कायद्याचा धाक हा असा मतलबी आहे या स्थितीत जागतिक गुन्हेगारीत पाकिस्तानदेखील आपल्यापेक्षा दोन टक्क्यांनी का असेना पण ‘सुरक्षित’ होणारच! वस्तुस्थिती ही आहे की,देशात सध्या कायद्याची भीती ना गुन्हेगारांना राहिली आहे,ना राज्यकर्ते स्वतः त्याचा धाक बाळगत आहेत.या क्रमवारीत हिंदुस्थानचा क्रमांक ८१ वा असेलही पण सरकारपुरस्कृत दहशतग्रस्त देशांची यादी कुणी बनवलीच तर त्यात मोदी राजवट अव्वल असेल.देशाच्या जागतिक प्रतिमेचे टाळ कुटणाऱ्या राज्यकर्त्यांनो,जरा तरी चाड बाळगा! असा खोचक सल्लाही ठाकरे गटाने दिला आहे.