Just another WordPress site

“महाराष्ट्रातील चिखल तसाच ठेवून भाजपाने आता उत्तर प्रदेशात चिखल केला”-सामनातून जहरी प्रहार

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१८ जुलै २३ मंगळवार

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर अजित पवार गटाने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून इतकेच नाही तर यानंतर अजित पवारांसह त्यांच्या गटातील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसह इतर नेत्यांवर गंभीर आरोप केले मात्र मागील काही दिवसात अजित पवार गटाने दोनदा शरद पवारांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.आता त्या भेटीवर ठाकरे गटाने आज दि.१८ जुलै मंगळवार रोजी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून सडकून टीका केली आहे.ठाकरे गटाने म्हटले आहे,राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा असतो असे जगन्मान्य सत्य आहे ते खरे होताना या महान भारतभूमीवर दिसत आहे.विठ्ठलाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना याच अड्ड्यावर प्रतिष्ठा मिळते आणि तेच बेइमान पुन्हा ‘बा पांडुरंगा,आम्हाला सांभाळून घ्या’ अशा विनवण्या करतात. बदमाशांच्या अड्ड्यावरची ही शिकवणी सर्वत्र अनैतिकतेचा चिखल करीत आहे.एकाधिकार,राज्यघटनेचे विडंबन व त्यातून निर्माण झालेली राजकीय माफियागिरी हेच भारताचे भविष्य होणार असेल तर एक दिवस या देशाचे डबके झाल्याशिवाय राहणार नाही.चिखल सर्वत्रच आहे तो संपवायचा कसा? बदमाशांचा शेवटचा अड्डा लोकशाही मार्गाने उद्ध्वस्त केल्याशिवाय ते शक्य होणार नाही.चिखलातून कमळ उगवावेत यासाठी भारतीय जनता पक्ष जी मेहनत घेत आहे त्याचे वर्णन करायला शब्द अपुरे पडावेत त्यासाठी ते जागोजाग चिखलच चिखल करीत आहेत.महाराष्ट्रातील चिखल तसाच ठेवून भाजपाने आता उत्तर प्रदेशात चिखल केला.योगी आदित्यनाथांसारखा लोकप्रिय,भगवे वस्त्रधारी नेता तेथे मुख्यमंत्री असताना भाजपाला त्या रामभूमीतही चिखल करावा लागतोय याचा अर्थ असा की २०२४ मध्ये बहुमतास लागणारी २८३ ‘कमळे’ फुलणार नाहीत हीच भीती त्यांना सतावत आहे असा दावा ठाकरे गटाने केला आहे.

ठाकरे गटाने पुढे म्हटले आहे की,उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील माफिया डॉन अतिक अहमद व सिवान येथील मुख्तार अन्सारी यांना मातीत मिळविण्याचा चंग मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बांधला होता.अतिक अहमद यांची हत्या झाली तर अन्सारी यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली गेली त्यांचे आमदारपुत्र अब्बास अन्सारी यांच्यावर ईडी,सीबीआय,पोलिसांच्या कारवाया सुरू आहेत पण आता ओमप्रकाश राजभर भाजपाच्या चरणी लीन झाल्यामुळे अन्सारी यांना कोणत्या व कशा सवलती मिळतात ते पाहायला हवे असे ठाकरे गटाने म्हटले आहे.मुख्तार अरी यांचा तेथील मुस्लीम समाजावर प्रभाव आहे.भाजपाला उत्तरेत मुसलमानांची मते हवीत आणि त्यासाठीच त्यांनी हा नवा चिखल निर्माण केला आहे.भाजपाला सत्ता हवी आहे आणि ती मिळवण्यासाठी तो कोणतीही तडजोड करायला तयार आहे.आता ओमप्रकाश राजभर भाजपाच्या तंबूत सामील झाले पण काही महिन्यांपूर्वी हेच राजभर गरजले होते की,प्रत्यक्ष परमेश्वराने आज्ञा केली तरी भाजपाचा हात पकडणार नाही.मोदी व शाहांना पुन्हा कायमचे गुजरातला पाठवले नाही तर मी माझ्या आईबापाची औलाद नाही तेच राजभर आज निर्लज्जपणे भाजपावासी झाले असेही ठाकरे गटाने नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.