Just another WordPress site

सोलापुरात अंधःश्रध्देचा धक्कादायक प्रकार- “अमावस्या असल्यामुळे रात्रभर मृतदेह पावसात घराबाहेर उघड्यावर!!”

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१९ जुलै २३ बुधवार
दहा हजार गरीब महिला विडी कामगारांचा निवारा असलेल्या गोदूताई परूळेकर घरकूल वसाहतीत माणुसकीला कलंक लावणारा धक्कादायक प्रकार समोर आला असून समाजात अजूनही अंधःश्रध्देचा पगडा किती घट्ट आहे याचीही प्रचिती आली.आजारपणामुळे रात्री मृत्यू झालेल्या घर भाडेकरूचा मृतदेह केवळ अमावस्या असल्यामुळे घरी आणण्यास घरमालकाने मज्जाव केला त्यामुळे मृतदेह घराबाहेर रात्रभर पाऊस झेलत उघड्यावर ठेवण्याची वेळ मृताच्या कुटुंबीयांवर ओढवली आहे.शंकर यल्लप्पा मुटकिरी वय ४९ वर्षे या शिंपीकाम करणा-या कामगाराचा पक्ष्याघाताच्या आजारामुळे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात मृत्यू झाला असता मृतदेह दि.१७ जुलै रोजी रात्री गोदूताई परूळेकर विडी घरकूल वसाहतीत घराकडे आणण्याची तयारी सुरू झाली परंतु घरमालकाने सोमवती अमावस्या असल्यामुळे मृतदेह घरी आणू दिला नाही.मृत शंकरची आई नागमणी वृध्द तर लहान भाऊ अनिल हा शारीरीकदृष्ट्या अपंग असल्याने अमावस्येचे कारण देऊन नातेवाईकांनीही पाठ फिरविलेली त्यातच सुरू असलेली पावसाची रिपरीप.कोणाच्याही मदतीविना वृध्द आई आणि विकलांग भावाने शंकर याचा मृतदेह घराकडे आणला खरा परंतु घरमालकाने अमावस्येचे कारण सांगून मृतदेह घरात ठेवण्यास पुन्हा मज्जाव केला तेव्हा रात्रभर पावसाच्या सरी कोसळत असताना शंकरचा मृतदेह घरासमोर उघड्यावर ठेवण्यात आला.मृतदेह पावसात भिजू नये म्हणून कोणीतरी एका व्यक्तीने प्लास्टिकचा आवरण आणून दिले तेवढीच दिसलेली माणुसकी.मृतदेह प्लास्टिकच्या आवरणात गुंडाळून रात्रभर उघड्यावर ठेवण्यात आल्याची वार्ता दुस-या दिवशी परिसरात पसरली आणि त्याची महिती छायाचित्रांसह समाज माध्यमांतून फैलावली. दरम्यान गोदूताई परूळेकर विडी घरकूल परिसरातील माकपचे कार्यकर्ते वसीम मुल्ला,विल्यम ससणे व इतर कार्यकर्त्यांनी धाव घेऊन मृतदेहाचा अंत्यविधी उरकण्यास मदत केली.

सोलापूर शहरालगत अक्कलकोट रस्त्यावर कुंभारी गावच्या हद्दीत सुमारे २० वर्षांपूर्वी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी तब्बल दहा हजार गरीब महिला विडी कामगारांसाठी गोदूताई परूळेकर यांच्या स्मरणार्थ पथदर्शी घरकूल प्रकल्प उभारला होता.तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी स्वतः येऊन या घरकूल प्रकल्पाच्या चाव्या लाभार्थी महिला विडी कामगारांना सुपूर्द केल्या होत्या त्याचवेळी संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक कामगार परिषदेत भारत देशात कामगारांसाठी भरीव,व्यापक निवारा योजना कशा पध्दतीने राबविल्या जातात याचे सादरीकरण याच गोदूताई परूळेकर महिला विडी घरकूल वसाहतीच्या माध्यमातून केंद्र सरकारमार्फत करण्यात आले होते.त्याचा खूप गाजावाजा झाला तरी दुसरीकडे या गरीब विडी कामगारांच्या घरकूल वसाहतीत दारू,जुगार,सावकारी आदी अवैध व्यवसाय सुरू आहेत.गुंडगिरीही वाढली आहे यातच अंधःश्रध्देचा पगडा कायम असल्याचे दिसून येते.माकप,सिटू यासह अन्य संस्था-संघटनांनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी पुढे यावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.