Just another WordPress site

“भारत जिंकणार, इंडिया जिंकणार आणि हुकूमशाहीचा पराभव होणार,हिंमत असेल तर भारताचा पराभव करून दाखवा”; संजय राऊतांचे आव्हान

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१९ जुलै २३ बुधवार
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओचे विधिमंडळात पडसाद उमटले असून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या किरीट सोमय्या यांना भाजपा पाठीशी घालणार का? असा सवाल विरोधकांनी विधान परिषदेत केला आहे.यावर किरीट सोमय्या यांच्यावरील आक्षेपार्ह व्हिडीओची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी केली जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दि.१८ जुलै मंगळवार रोजी केली याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठिकठिकाणी सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन केले.दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर मुंबई पोलीस सक्रिय झाले आहेत यावरून संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे ते आज दि.१९ जुलै बुधवार रोजी प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.किरीट सोमय्या प्रकरणी आज संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले की,मी गांधींजीचा भक्त आहे.मी वाईट पाहत नाही.मी वाईट ऐकत नाही परंतु वाईटाचा अंत नक्कीच करतो.आमच्यावर संस्कार आहेत.या राज्याची परंपरा आहे. बाळासाहेबांनी सांगितले आहे की कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका त्यांना पत्नी आहे मुल आहेत त्यांनी कोणते पाप केले असेल तर त्यांना भोगावे लागेल.मी का बोलू? असेही संजय राऊत म्हणाले.

देशातील विरोधी पक्षांची काल संयुक्त बैठक बंगळुरूत पार पडली या बैठकीत २६ पक्षांच्या आघाडीला INDIA हे नाव देण्यात आले असून Indian National Development Inclusive Alliance असा त्याचा पूर्ण अर्थ होतो मात्र यावरून भाजपाने टीका केली आहे.हा भारताचा अपमान असल्याचे म्हटले जात आहे यावरून संजय राऊतांनी भाजपावर टीकास्र सोडले आहे.नऊ वर्षांत एनडीए आठवली नाही.मित्र पक्ष आठवले नाहीत परंतु आम्ही एकत्र आल्यावर त्यांना एनडीए आठवली याबद्दल एनडीएच्या लोकांनी मोदींचा सत्कारच केला पाहिजे ही भीती आहे.आम्ही एकत्र आलो आहोत हा इंडिया आहे फक्त मोदींनाच वोट फॉर इंडिया बोलण्याचा अधिकार नाही.मोदी इज इंडिया,हा इंडियाचा अपमान नाही का? वारंवार मोदींनी आपल्या भाषणात आम्ही म्हणजे इंडिया आहोत असे म्हटले आहे याचा अर्थ काय होतो? मोदी म्हणजे इंडिया नाही.भाजपा म्हणजे इंडिया नाही प्रत्येक व्यक्ती इंडिया आहे असे संजय राऊत म्हणाले.भ्रष्टाचारी लोकांची ही आघाडी असल्याची टीकाही भाजपाकडून करण्यात आली आहे यावरून संजय राऊत म्हणाले की,७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा तुमच्या बाजूला उभा आहे. पाठिमागे इक्बाल मिरची उभा आहे हे ढोंग बंद करा हे ढोंग लोकांना कळतंय तुम्ही म्हणजेच इंडिया हे आम्ही मानत नाही हे नागरिक म्हणजे इंडिया आहे.आम्ही २६ पक्ष एकत्र आल्यावर तुमच्या एनडीएचे कमळ फुलायला लागले.आम्ही भारत म्हणून देश म्हणून एकत्र आल्यावर तुम्हाला एनडीए आठवली.हा इंडिया तुमच्या हुकूमशाहीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही.भारत जिंकणार, इंडिया जिंकणार आणि हुकूमशाहीचा पराभव होणार.हिंमत असेल तर भारताचा पराभव करून दाखवा असे आव्हान संजय राऊत यांच्याकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.