मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२१ जुलै २३ शुक्रवार
दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रायगड पूरस्थितीशी झुंजत असतांना खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीला बुधवारी मध्यरात्री डोंगरसमाधी मिळाली.इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेल्या या वाडीवर दरड कोसळून आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दि.२१ जुलै शुक्रवारी विधानसभेत दिली.यावेळी ४८ कुटुंबांच्या या गावात २२८ नागरिक राहत होते परंतु आतापर्यंत फक्त १०९ नागरिकांची ओळख पटवण्यात आली आहे त्यामुळे उर्वरित नागरिकांना शोधण्याचे मोठे आव्हान बचावकार्य पथकाकडे आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.इर्शाळवाडीकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने यंत्रसामुग्री नेणे अशक्य बनले त्यामळे मनुष्यबळाच्या मदतीने दिवसभर बचावकार्य सुरू होते त्यासाठी सरकारने दोन हेलिकॉप्टर तैनात ठेवली होती मात्र दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने त्यांचा वापर करता आला नाही.
दि.१९ जुलैच्या रात्री ही घटना घडली.लोक झोपण्याच्या तयारीत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला मात्र यावेळी आश्रमशाळेतील मुले खेळत होती त्यांना काहीतरी कोसळण्याचा मोठा आवाज आला त्यांच्यामुळे काही लोक सतर्क झाले आणि त्यांनी तातडीने घराबाहेर धाव घेतली परंतु ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचू शकली नाही ते ढिगाऱ्याखाली अडकले यामुळे २०-२५ लोक वाचू शकले काही लोक मासेमारीसाठी गेले होते काही लोक भातशेतीसाठी गेले होते काही लोक बाहेर असण्याची शक्यता आहे.१०० वर्षांपासून राहणारे ते रहिवासी होते.दरडप्रवण क्षेत्राच्या यादीतही त्यांचे नाव नव्हते तरीही तिथे इर्शाळगडावरील दरड कोसळली.सुरुवातीला अशी माहिती मिळाली होती की ४८ घरांवर तो डोंगर पडला परंतु आम्ही गेलो तेव्हा १७-१८ घरांवर मलबा होता.कालपर्यंत १०९ लोकांची ओळख पटली आहे त्यापैकी २० जणांचा मृत्यू तर आठ जण जखमी आहेत अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.मृतदेहांची विल्हेवाट लावणे हेदेखील जिकरीचे काम होते.एकीकडे मलबा हटवण्याचे काम सुरू होते.मृतांच्या नातेवाईकांशी बोलून वाडीवरच विधी करण्याचे ठरवले.अतिशय भयानक आणि भीषण परिस्थिती होती परंतु या काळात सर्वांनी माणुसकी दाखवली.आवश्यक ती सर्व मदत रेस्क्यू टीमने केली.पाणी,बिस्कीटेही पुरवण्यात आली.मृतांच्या नातेवाईकांना खाली आणले त्यांना शाळेत ठेवले त्यांची व्यवस्था केली.एनडीआरएफमुळे मोठी मदत झाली.अख्खा डोंगर घरांवर कोसळला. जी घरे बंद होती त्या लोकांचा शोध सुरू आहे.आपण अपेक्षा करूया की बाहेरचा आकडा जास्त असावा अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
निसरडी वाट आणि हवामानामुळे कोणत्याच मशिन्स दुर्घटनास्थळी घेऊन जाणे शक्य नव्हते.या काळात मनुष्यबळाचीच सर्वांत मोठी साथ लाभली.याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,या दुर्घटनेची माहिती रात्री ११.३५ ला मिळाली त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेमार्फत बचावकार्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्यात आल्या.अतिशय दुर्गम भाग होता,पाऊस होता,वादळी वारा होता तरीही १२.४० च्या सुमारास घटनास्थळावर यंत्रणा पोहोचली.मी सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो.तिकडे स्थानिक बचावकार्यासाठी यशवंती हायकर्स या सामाजिक संस्थेचे २५ स्वयंसेवक,चौक येथील ३० ग्रामस्थ,नगरपालिका खोपोली येथील कर्मचारी,पोलाडचे रिव्हर फायटर पोहोचले.एनडीआरएफच्या चार टीम पोहोचल्या.टीडीआरफएची पाच पथके यांनी मोलाची कामगिरी बजावली.या घनटेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी,एसपी,आयजी, प्रांताधिकारी,तहसीलदार ताबडतोब पोहोचले.तिथून ते माझ्याशी संपर्कात होते.गिरीश महाजन यांना फोन केला तेही तत्काळ रात्रीच निघाले. रात्री साडेतीन वाजता ते स्पॉटला पोहोचले.आमदार महेश बालदीही सोबत होते अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.मी पहाटे गेलो.तिथे रस्ता नाही,गाडी जात नाही,सायकलही जाऊ शकत नाही.उंच डोंगऱ्याच्या कपारीत हे गाव वसल आहे.आमदार अनिल पाटील,आदिती तटकरे,दादा भुसे,अनिकेत तटकरेही तिथे उपस्थित होते.ज्यांना जसे माहित पडले ते तिथे पोहोचले.दुर्घटनाग्रस्तांना बाहेर काढणे ही महत्त्वाची कामगिरी होती.इतर वेळेला,जेसीबी लागते,मशिनरी लागते,पोकलेन लागते अशा परिस्थितीत इर्शाळगडाच्या पायथ्याशी रुग्णवाहिकेसह सर्व तैनात होते.परंतु तिथे वर मनुष्यबळाशिवाय पर्याय नव्हता.सिडकोच्या डिगेकर यांना फोन केल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात मॅन पॉवर पाठवले.जे जे मिळाले त्यांना तिथे रावाना केले अशीही माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.