Just another WordPress site

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा २७ वर;इर्शाळवाडी आणि बेस कॅम्प येथे जमावबंदी आदेश लागू

रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२३ जुलै २३ रविवार

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा २७ वर पोहोचला असून दिवसभराच्या अथक प्रयत्नानंतर पाच मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले आहे यात चार महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे. इरशाळवाडी आणि परिसरात होणारी गर्दी लक्षात घेऊन शनिवारी प्रशासनाने जमावबंदी लागू केली आहे.दरम्यान बचावकार्याच्या पहिल्या दिवशी १६,दुसऱ्या दिवशी ६ तर तिसऱ्या दिवशी चार असे एकूण २६ मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत ज्यात १२ पुरुष आणि १४ महिलांचा समावेश आहे.शनिवारी सकाळी ७ वाजता मदत व बचाव पथकांनी शोधकार्याची सुरुवात केली.आजही  शोधमोहिमेत अडचणी येत होत्या.बचावकार्यासाठी आजही यांत्रिक मदत उपलब्ध होऊ शकली नाही त्यामुळे एनडीआरएफ,टीडीआरएफ,स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांच्या मदतीने शोध व बचावकार्य सुरू ठेवण्यात आले.दिवसभरात नांगी किसन पिरकड वय ५० वर्षे,पिंकी संदेश पारधी वय २३ वर्षे,कृष्णा किसन पिरकड वय ३२ वर्षे,भारती मधु भुतांबरा वय १८ वर्षे आणि हिरा मधू भुतंबरा वय १६ वर्षे या पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

दरम्यान या दुर्घटनेला तीन दिवस पूर्ण झाले असून दरडीखाली दबलेल्या मृतदेहांचे विघटन होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.आसपासच्या परिसरात दुर्गंधी पसरली असून यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळे कर्जतचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांनी इर्शाळवाडी आणि बेस कॅम्प येथे जमावबंदी आदेश लागू केले आहेत.मदत व बचाव पथकांशिवाय आणि शासनाने नियुक्त केलेल्या सेवाभावी संस्थांव्यतिरिक्त आता या परिसरात कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.बचाव मोहीम रविवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.