Just another WordPress site

निधी वाटपावरून ठाकरे गटावर अन्याय -अंबादास दानवे यांची सरकारवर टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ जुलै २३ सोमवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याची सूत्रे हाती आल्यानंतर आठवडाभरातच राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर निधीवर्षाव करण्यात आला असून त्यांनी या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी २५ कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर केला आहे.यावरून विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत असून आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीकास्र सोडले आहे.ठाकरे गटाच्या आमदारांना कसल्याही प्रकारचा निधी मिळाला नाही हा आमच्या आमदारांवर झालेला अन्याय आहे हा मुद्दा अधिवेशनात मांडला जाईल असे अंबादास दानवे यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.निधी वाटपावर भाष्य करताना अंबादास दानवे म्हणाले,अजित पवार हे आम्हाला निधी देत नाहीत म्हणून आम्ही शिवसेना सोडली असे सांगत आमच्या पक्षातील ४० गद्दार तिकडे गेले होते आता अजित पवार यांनी त्यांच्याबरोबर गेलेल्या आणि त्यांच्याबरोबर न गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनाही २५ ते ५० कोटी रुपयांचे निधी वाटप केले असून एक-दोन आमदारांनी यादी दिली नाही म्हणून त्यांना निधी दिला नसेल बाकी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना अजित पवारांनी निधी दिला आहे.
आता आमचे शिवसेनेचे जे आमदार ओरडत होते.टाहो फोडत होते.आम्ही स्वाभिमानाने गेलो असे सांगत होते ते आमदार आता अजित पवारांच्या निर्णयावर काय बोलणार? यावर आता शिंदे गटाने उत्तर द्यावे अशी माझी भूमिका असून उद्धव ठाकरे यांच्याबरोबर थांबलेल्या आमदारांना या वर्षभरात कोणताही निधी मिळाला नाही.ठाकरे गटाच्या आमदारांना सापत्न वागणूक दिली जात असून सरकारकडून मंजूर झालेल्या निधीवरील स्थगिती अद्याप उठवली नाही त्यामुळे अधिवेशनात हा मुद्दा मांडला जाईल.काहीजण न्यायालयातही गेले असून त्यांच्या आमदारांना ५० कोटी दिले म्हणून आम्ही आमच्या आमदारांनाही ५० कोटीच द्या अशी मागणी आम्ही करत नाही पण आमच्या आमदारांना किमान ३० किंवा २० कोटी तरी द्या अशी आमची भूमिका आहे पण अशाप्रकारे जर निधीचे वाटप होत असेल तर तो अन्याय आहे असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.