सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ जुलै २३ सोमवार
जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका गुरूजींची बदली झाली अन् शाळेतील पोर-पोरी तर धाय मोकलून रडलीच पण शाळेची गळती थांबविण्यासाठी पोरांना भाकरी करायला शिकवणारे गुरूजी जातात म्हटल्यावर निरोप द्यायला सारा गाव जमला.पोरा-पोरींनी तर गुरूजींच्यावर उधळलेली फुले म्हणजे अश्रूंची फुलेच झाली.जत तालुक्यातील कुलाळवाडी हे गाव असून साखर कारखान्याचा हंगाम सुरू झाला की रोजीरोटीसाठी गाव सोडून परागंदा होण्याची तरूण पिढीची पध्दत असल्यामुळे शाळेला लहान मुलांचीही दांडी ठरलेलीच.मुलांच्या गैरहजेरीला कारण काय याचा शोध घेतांना शाळेचे शिक्षक भक्तराज गर्जे यांना याचे मूळ भाकरीत असल्याचे कळाले.आई-वडिल उसतोडीला जातात मग घरी भाकरी कोण करणार? या प्रश्नातून मुलांनाही सोबत नेणारे पालक दिसले यामुळे भक्तराज गर्जे गुरूजींनी मुलांनाच भाकरी करण्यासाठी शिकवले यातून मुलासाठी स्वातंत्र्यदिनी,प्रजासत्ताक दिनी भाकरी करण्याच्या स्पर्धा शाळेत भरवल्या.पौर्णिमेच्या चंद्रासारखी भाकरी करणार्याला बक्षिस ठेवले यातून मुलांची शाळाही सुरू राहिली आणि घरात राहणार्या आजी आजोबासोबत मुलांच्या भाकरीचा प्रश्नही मिटला.
मुलांना भाकरी करायला शिकवणारे भक्तराज गर्जे गुरुजी यांची चाळीसगावला विनंती बदली झाली असून गुरूजी गावाकडे जाणार म्हटल्यावर निरोप देण्यासाठी अख्खा गाव काल दि.२३ जुलै रविवार रोजी सायंकाळी कुलाळवाडीच्या शाळेत जमला.यावेळी गुरूजींनी भाकरी करायला शिकवलेली पोर-पोरी तर होतीच पण गावातील जाणती माणसेही जमली होती.गुरूजी जाणार म्हटल्यावर शाळेची पोर पोरी गुरूजींच्या गळ्यात पडून रडत होती तर आया-बाया गुरूजींची दृष्ट काढण्यासाठी ओवाळणी करून बोटे मोडत होत्या.यावेळी गुलाब ठोंबरे,वैभवी धडस, सुषमा कुलाळ,जान्हवी परीट ही बच्चे कंपनी तर भाषणासाठी उभी राहिली मात्र त्यांच्या डोळ्यातील आसवांनीच भक्तराज गर्जे गुरूजीबद्दलच्या भावना सारे काही शब्दावाचून सांगून गेल्या.