काँग्रेस अध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होणार ?
ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे,खा.शशी थरूर आणि झारखंड काँग्रेसचे नेते केएन त्रिपाठी यांनी अर्ज दाखल
दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठीचे चित्र स्पष्ट झालं आहे.आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता.त्यानुसार आज अखेर ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे,खासदार शशी थरूर आणि झारखंड काँग्रेसचे नेते केएन त्रिपाठी यांनी अर्ज दाखल केले आहेत.त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होणार आहे.काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्जाला २४ ऑक्टोबर पासून सुरुवात झाली.त्यांनतर अनके नाट्यमय घडामोडी घडल्या.राहुल गांधी यांनी निवडणूक लहवण्यास नकार दिल्यानंतर सर्वप्रथम राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे नाव समोर आलं. गेहलोत उमेदवारी अर्ज भरणारही होते मात्र तेवढ्यात राजस्थान मध्ये झालेल्या राजकीय घडामोडींनंतर त्यांनी माघार घेत सोनिया गांधींची माफीही मागितली.केरळच्या तिरुअनंतपुरममधून तिसऱ्यांदा लोकसभा खासदार झालेले शशी थरूर यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी सर्वात आधी उमेदवारी अर्ज भरला. शशी थरुर हे जी २३ गटाच्या नेत्यांपैकी एक आहेत.शशी थरूर हे उच्च शिक्षित असून संयुक्त राष्ट्रामध्ये अनेक दशकं त्यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलं आहे.
शशी थरूर यांच्यानंतर दिग्विजय सिंह यांनी निवडणूक लढवण्याचे जाहीर केलं.मात्र अचानकपणे गांधी घराण्याचे विश्वासू असलेले जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी या निवडणुकीत एन्ट्री घेतल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी माघार घेतली. मल्लिकार्जुन खर्गे हे आमचे जेष्ठ नेते असून त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा मी विचारही करू शकत नाही. त्यामुळे मी त्यांचा प्रस्तावक असेल असं म्हणत दिग्विजयसिंह हे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर पडले आहेत.त्यानंतर आज अखेरच्या दिवशी मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. त्यांच्या उमेदवारीच्या समर्थकांमध्ये पक्षाचे नेते अशोक गेहलोत, दिग्विजय सिंग,प्रमोद तिवारी,पीएल पुनिया,एके अँटनी, पवनकुमार बन्सल आणि मुकुल वासनिक यांचा समावेश होता. याशिवाय G23 गटाचे भूपिंदर सिंह हुड्डा, आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण, मनीष तिवारी यांचीही उपस्थिती होती.
शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशिवाय झारखंड काँग्रेसचे नेते केएन त्रिपाठी यांनीही काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे.उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचा आदर केला जाईल, असे सांगितले. काँग्रेसमध्ये अंतर्गत लोकशाही आहे. शेतकऱ्यांचा मुलगा अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतो, अशी अंतर्गत लोकशाहीची मागणी आहे आणि भाजपमध्ये हे शक्य नाही असं त्यांनी म्हंटल. यामुळे काँग्रेस अध्यक्ष पदासाठी शशी थरूर, मल्लिकार्जुन खर्गे आणि केएन त्रिपाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ८ ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.तोपर्यंत कोण अर्ज मागे घेतंय की काँग्रेस अध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होते ते पाहावं लागेल.