मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२६ जुलै २३ बुधवार
मागील दोन-तीन दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये निधी वाटपावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात असून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही निधी वाटपावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल केला आहे.दरम्यान यावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यात विधानसभेच्या सभागृहात कलगीतुरा रंगला.सभागृहातील खडाजंगीनंतर यशोमती ठाकूर यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला.तुम्ही महाराष्ट्राची घाण करत आहात हे नक्की अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.खरे तर विधानसभेत निधी वाटपावरून विरोधकांनी आरोप केल्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले असून निधी वाटप करताना कोणताही भेदभाव केला नाही.२०१९,२०२० आणि २०२१ या काळात निधीवाटपाबद्दल जे साधारण सूत्र होते तेच सूत्र आम्ही पुढे कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये फारसा काही बदल केला नाही असे उत्तर अजित पवारांनी दिले आहे.अजित पवारांच्या या उत्तरावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर जोरदार आक्षेप नोंदवला आहे.
यशोमती ठाकूर यांच्या आक्षेपानंतर अजित पवार म्हणाले यशोमतीताई तुम्ही माझ्या भगिनींसारख्या आहात माझे ऐकून घ्या.माझे ऐकून घेतल्यानंतर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे.भावाच्या नात्याने तुम्हाला ओवाळणी देतो.काळजी करू नका यावर यशोमती ठाकूर म्हणाल्या तुम्ही १५ दिवसांतच सावत्र भावासारखे वागायला लागलात.यानंतर अजित पवार म्हणाले,तुम्ही चष्मा बदला व सावत्र भावाप्रमाणे माझ्याकडे बघू नका.मी सावत्र बहीण म्हणून तुमच्याकडे बघत नाही.विधानसभा सभागृहात अजित पवारांबरोबर झालेल्या खडाजंगीनंतर यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.विधानभवनाबाहेर ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधतांना अजित पवारांना उद्देशून यशोमती ठाकूर म्हणाल्या,तुम्ही माझा भाऊ आहे असे मला वाटत होते पण आता भाऊ १५ दिवसांत सावत्र भावासारखा वागायला लागला तर कसे चालेल.महाराष्ट्राला ते शोभत नाहीये.तुम्ही महाराष्ट्राची घाण करताय हे नक्की अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे.