“लगेच तो संत झाला लाँड्रीत जाऊन” हा समान नागरी कायदा होऊ शकत नाही
उद्धव ठाकरे यांची समान नागरी कायद्या वरून स्पष्ट भूमिका
आगामी २०२४ च्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने समान नागरी कायद्याचा नारा दिला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या अनेक नेत्यांनी समान नागरी कायद्याचा पुनरूच्चार करून आगामी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे यापार्श्वभूमीवर समान नागरी कायद्याबाबत अनेक पक्षांची भूमिका अनिश्चित असतांना उद्धव ठाकरेंनीही याबाबत भाष्य केले आहे.‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्ट माध्यमातून सामनाला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत ते बोलत होते.संजय राऊतांनी त्यांची मुलाखत घेतली आहे.२०२४ च्या निवडणुकांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो समान नागरी कायदा असे संजय राऊत म्हणताच,“म्हणजे काय?” असा प्रतिसवाल उद्धव ठाकरेंनी राऊतांना विचारला. “लोकांनाही तोच प्रश्न पडलाय की म्हणजे काय? शिवसेनेची भूमिका काय असेल?”असा सवाल राऊतांनी केला.समान नागरी कायद्यावर आपण नंतर बोलूच कारण त्याच्याबद्दल शिवसेनाप्रमुखांनी आपली भूमिका अत्यंत परखडपणे आणि स्पष्टपणे मांडली आहे.समान नागरी कायदा करत असाल तर पहिले जे मी तुम्हाला सांगितले तेच पुन्हा सांगेन.काश्मीर ते कन्याकुमारी गोवंश हत्याबंदी करून दाखवा.मणिपूरमध्ये शांतता राबवून दाखवा तिकडे काही करू शकत नाही तुम्ही आणि समान नागरी कायद्याचा अर्थ केवळ तुम्ही कुणाच्या लग्नापुरता ठेवणार असाल तर तो भाग वेगळा पण कायद्यापुढे सगळे समान असतील तर तुमच्यातल्या भ्रष्टाचाऱ्यांनासुद्धा शिक्षा झालीच पाहिजे.मला वाटते हा समान नागरी कायद्याचा अर्थ सर्वसामान्य जनतेला अभिप्रेत आहे दुसरीकडे असला तर तो व्यभिचारी किंवा भ्रष्टाचारी आणि त्यांच्याकडे असला की लगेच तो संत झाला लाँड्रीत जाऊन हा समान नागरी कायदा होऊ शकत नाही अशी स्पष्ट भूमिका ठाकरेंनी मांडली.
राममंदिराचा विषय आता जवळजवळ संपत आला आहे.ट्रिपल तलाकचा विषयसुद्धा संपला आहे.३७० कलम आणि जम्मू-काश्मीर हा विषय संपला पण अजूनही काश्मिरी पंडितांचा संपला नाही हा मुद्दा संजय राऊतांनी उपस्थित केला त्यावर ठाकरे म्हणाले की,तेच माझे म्हणणे आहे. ३७० कलम काढायला शिवसेनेने पाठिंबा दिला पण हे कलम काढल्यानंतर अजूनही तिकडे टार्गेट किलिंग होतेय.काश्मिरी पंडित खोऱ्यात परत जाऊ शकत नाहीत.तिकडे जाऊन कोणी जमीन खरेदी करू शकत नाहीत.निवडणुका होत नाहीयत.काश्मीरचे तसे तुकडे केले आहेत.लेह, लडाख वेगळा काढला.जम्मू वेगळा केला मग आता निवडणुका का घेत नाही तुम्ही? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.जेव्हा मेहबुबा मुफ्तीवरून मध्यंतरी भरपूर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.(INDIA च्या) पहिल्या मीटिंगमध्ये मीच त्यांच्या बाजूला जाऊन बसलो होतो पण भाजपही त्यांच्यासोबत सत्तेत बसले होते ना! तेव्हा फडणवीस म्हणाले होते की त्यावेळी अतिरेक्यांनी धमकी दिली होती तुम्ही काश्मीरला निवडणुका कशा घेता ते पाहू. घेऊन दाखवा. म्हणून आम्ही निवडणुका घेऊन दाखवल्या.सरकार कसे स्थापन करता ते बघतो अशी धमकी अतिरेक्यांनी दिली तेव्हा आम्ही मेहबुबाबरोबर गेलो व सरकार बनवले तेव्हा पाकिस्तानने धमकी दिली म्हणून निवडणुका घेऊन दाखवल्या मग आता काश्मिरात निवडणुका का होत नाहीत? आता मेहबुबांबद्दल बोलताय त्या तर तुमच्यासोबत पण होत्याच ना आता परिस्थिती अशी आहे. भारत-पाक क्रिकेट सामनाच अहमदाबादेत होतोय म्हणजे पाकिस्तानसोबत सुद्धा तुमची मैत्री झाली असेल असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.