“मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर आणि मणिपूर घटनेच्या अयोग्य हाताळणीवर भाजपा नेते व बिहारमधील पक्षाचे प्रवक्ते विनोद शर्मा यांचा पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा!!”
“मणिपूरसारखी घटना आधी कधीही कुठे घडली नाही परंतु तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही झोपेतच” भाजपा नेत्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत पक्षाचा राजीनामा!
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातच राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत असून विरोधी पक्षांच्या INDIA या आघाडीने संसदेत सत्ताधारी एनडीए व विशेषत: भाजपाविरोधात विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली आहे.काल दि.२७ जुलै गुरुवार रोजी विरोधी पक्षांचे खासदार सरकारचा निषेध करण्यासाठी चक्क काळे कपडे घालून संसदेच्या कामकाजात सहभागी झाले होते या पार्श्वभूमीवर आता भाजपाच्याच एका नेत्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला असून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.मणिपूरमध्ये ४ मे रोजी घडलेल्या एका विक्षिप्त घटनेचा व्हिडीओ गेल्या आठवड्यात देशभर व्हायरल झाला त्यात दोन महिलांची नग्न धिंड काढल्याच्या या व्हिडीओमुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घटनेच्या दोन महिन्यांनंतर संसदेत न बोलता फक्त माध्यमांसमोर त्यांनी भूमिका मांडल्यामुळे विरोधकांनी हा मुद्दा अधिवेशनात लावून धरला आहे. मणिपूरमध्ये अंतर्गत सामाजिक असंतोषामुळे गेल्या तीन महिन्यांपासून जनजीवन विस्कळीत झाले असून या पार्श्वभूमीवर देशभरातून विरोधकांनी मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असतांनाच खुद्द भाजपाच्या एका नेत्याने मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर आणि मणिपूर घटनेच्या अयोग्य हाताळणीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे तसेच पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामाही दिला आहे.
भाजपा नेते व बिहारमधील पक्षाचे प्रवक्ते विनोद शर्मा यांनी काल दि.२७ जुलै गुरुवार रोजी पक्षाचा राजीनामा दिला असून “मी फार जड अंत:करणाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपल्या भावना कळवल्या असून मणिपूरसारखी घटना आधी कधीही कुठे घडली नाही परंतु तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही झोपेतच आहेत तसेच मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना पदावरून हटवण्याची मोदींमध्ये हिंमत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया विनोद शर्मा यांनी दिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतांनाच विनोद शर्मा यांनी आपल्या भाजपा पक्षालाही लक्ष्य केले आहे.“भाजपा नारी शक्ती,बेटी बचाओ,हिंदू राष्ट्र,सनातन धर्माच्या गोष्टी करते हा आपला सनातन धर्म आहे का? एक माणूस म्हणून मी हे सगळे सहन करू शकत नाही त्यामुळे मी अन्यायाविरोधात बोलत आहे असे विनोद शर्मा यांनी म्हटले आहे.