“महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने संभाजी भिडे यांना १५३ अंतर्गत अटक करण्यात यावी”
पृथ्वीराज चव्हाण यांची विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते परंतु करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत असे वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी केले आहे. यावरून आज दि.२८ जुलै शुक्रवार रोजी विधानसभेत विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,संभाजी भिडे नावाच्या गृहस्थाने महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले असून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीला कलम १५३ अंतर्गत अटक केली पाहिजे अशाप्रकारे अनेक वर्षापासून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम ते करत आहेत.
राष्ट्रपित्याबद्दल विधान केल्यानंतर हा माणूस बाहेर कसा फिरू शकतो यानंतर काही प्रतिक्रिया उमटल्या तर याला जबाबदार कोण असणार आहे? त्यामुळे कलम १५३ अंतर्गत या व्यक्तीला अटक केली पाहिजे अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले की,पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीची नोंद घेऊन सरकारने उचित कार्यवाही करावी.तर याची नोंदी घेतली आहे.चौकशी करून योग्य ती कार्यवाही करू असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.