मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२८ जुलै २३ शुक्रवार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या दि.२९ जुलै शनिवार रोजी ठाण्यात येणार आहेत.ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी हिंदी भाषिक कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन गडकरी रंगायतन येथे केले असून उद्धव ठाकरे हे यापूर्वी जैन समाजाच्या कार्यक्रमासाठी ठाण्यात उपस्थित होते त्यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरे ठाण्यात येणार असल्याने ठाकरे नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शिवसेनेच्या फूटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मोठ्याप्रमाणात नेते,पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत.ठाण्यातील सर्वाधिक माजी नगरसेवक हे सध्या शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहे त्यामुळे ठाण्यात ठाकरे यांना मोठा फटका बसला आहे.असे असले तरी खासदार राजन विचारे,शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्यासह काही जुने शिवसैनिक हे ठाकरे यांच्यासोबत आहेत.
काही महिन्यांपूर्वीच टेंभीनाका येथील जैन मंदिरातील एका कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे हे ठाण्यात आले होते त्यावेळी त्यांनी ठाण्यात जाहीर सभा घेणार असल्याचे म्हटले होते त्यानंतर ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना मारहाण झाली होती त्यावेळी त्यांची ठाण्यात येऊन उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली होती व आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे ठाण्यात येणार आहेत.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गडकरी रंगायतन येथे हिंदी भाषिक कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात उद्धव ठाकरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच खासदार संजय राऊत,विनायक राऊत,प्रियंका चतुर्वेदी हे देखील उपस्थित राहणार आहेत.