“संभाजी भिडे जे बोलले ते इतके घृणास्पद नव्हते जितके त्यांच्यासमोर बसलेल्या प्रेक्षकांनी हसून त्या विधानाचे समर्थन करणे घृणास्पद होते”
महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींनी भिडेंच्या सभेत उपस्थित प्रेक्षकांच्या वर्तनावर नोंदविला आक्षेप
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे हे त्यांच्या विधानांमुळे अनेकदा चर्चेत आणि प्रसंगी वादात आल्याचे पाहायला मिळाले असून नुकतेच त्यांनी अमरावतीमध्ये बोलतांना थेट राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत केलेले विधान सध्या वादाचा विषय ठरले आहे त्यांच्या आक्षेपार्ह विधानावर राजकीय वर्तुळासह समाजातील विविध घटकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत असतांना आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना संभाजी भिडेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे यावेळी तुषार गांधींना अश्रू अनावर झाले हे विशेष !.संभाजी भिडे यांनी बडनेरातील जय भारत मंगलम येथील सभेत बोलतांना महात्मा गांधींचे वडील करमचंद गांधी नसून एक मुस्लीम जमीनदार होते असे विधान केले आहे.मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते.करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत तसेच मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले असे संभाजी भिडे म्हणाले आहेत.
दरम्यान एकीकडे संभाजी भिडेंच्या या वक्तव्यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतांना तुषार गांधी यांनी वेगळ्याच गोष्टीची चिंता व्यक्त केली असून संभाजी भिडे जे बोलले ते इतके घृणास्पद नव्हते जितके त्यांच्यासमोर बसलेल्या प्रेक्षकांनी हसून त्या विधानाचे समर्थन करणे घृणास्पद होते असे तुषार गांधी यांनी म्हटले आहे.या राज्याच्या मानसिकतेची विकृतता किती झाली असल्याचे हे उदाहरण असून आपल्याला त्याची चिंता असायला हवी की,आपला समाज इतका विकृत कसा झाला की विचारांचा द्वेष विचारांनी न करता त्या विचाराच्या व्यक्तीच्या आई-वडिलांबाबत तुम्ही अपमानजनक बोलता.महाराष्ट्राची ओळख पुरोगामी होती परंतु तिथे नारीशक्ती इतकी लुप्त कशी झाली की एका आईचा इतका मोठा अपमान केला जात असतांना महाराष्ट्रात एकही महिला याविरोधात आवाज उठवत नाही,एकाही महिलेला स्वत:चा अपमान होतोय असे वाटत नाही ही चिंतेची गोष्ट आहे हे एका कुटुंबापुरते मर्यादित नाहीय अशा शब्दांत तुषार गांधींनी भिडेंच्या सभेत उपस्थित प्रेक्षकांच्या वर्तनावर आक्षेप घेतला आहे.यावेळी तुषार गांधींना अश्रू अनावर झाले व भावनिक होत त्यांनी आपल्याला समाजाच्या या वर्तनाची जास्त चिंता असल्याचे मत व्यक्त केले आहे.