Just another WordPress site

“हा सगळा अजेंडा आरएसएसचा असून संभाजी भिडे फक्त एक सोंगाड्या आहे व तो त्याला लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचतो”

संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरून महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केला संताप

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ जुलै २३ शनिवार

संभाजी भिडेंनी राष्ट्रपिता महात्मा गाधींबाबत केलेल्या विधानावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला असून या विधानाचे आणि त्यावरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनातही उमटल्याचे पाहायला मिळाले आहे.दरम्यान संभाजी भिडेंनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देतांना महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून संभाजी भिडे फक्त एक सोंगाड्या असून त्यांना दिलेली स्क्रिप्ट ते सादर करत असल्याचे तुषार गांधी यांनी म्हटले आहे.अमरावतीच्या बडनेरामध्ये झालेल्या कार्यक्रमात संभाजी भिडेंनी महात्मा गांधींच्या वडिलांविषयी वादग्रस्त विधान केले असून मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते व करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले व त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत तसेच मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले असे संभाजी भिडे म्हणाले होते.

संभाजी भिडे हे आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावरच हे सगळं बोलत असल्याचा आरोप तुषार गांधी यांनी प्रसार माध्यमाशी बोलतांना केला आहे.या विधानावर स्पष्टीकरण देण्याची गरज नाही कारण एका गलिच्छ,विकृत,हीन मानसिकतेच्या माणसाने केलेले हे आक्षेप आहेत.हे भिडे बोलत नाहीयेत.भिडे कुणाच्यातरी इशाऱ्यावर हे करत आहेत.गांधी हत्येपासून हा गांधीद्वेष प्रखर पद्धतीने नागपूरहून (आरएसएसकडून) केला जातो हा नागपूरचा अजेंडा आहे हे सगळ्यांना माहिती असायला पाहिजे.नागपूरच्याच इशाऱ्यावर गोडसेनी बापूंवर तीन गोळ्या झाडल्या होत्या असे तुषार गांधी म्हणाले.जेव्हा त्यांना समजले की व्यक्तीची हत्या झाली पण विचार प्रखर झाले तेव्हापासून नागपूरच्या,आरएसएसच्या इशाऱ्यावर गांधीद्वेषाची एक मोहीम चालवली जात आहे यात वेळोवेळी अशी माणसे समोर येतात त्यांना दिलेल्या स्क्रिप्ट्सवर ते लोक आपली भूमिका फक्त निभावून जातात हे विकृत आणि अश्लील विचारधारेचे उत्पादन आहे अशा शब्दांत तुषार गांधींनी आपला संताप व्यक्त केला आहे.

आरएसएसचा हा अजेंडा आहे व वेगवेगळ्या पद्धतीने गांधींच्या बाबतीत द्वेष पसरवणे तसेच त्यांचे चारित्र्यहनन करून त्यांची प्रतिमा मलीन करायची आहे त्यातून या अफवा लोकांच्या मनावर बिंबवायच्या आहेत हा संदर्भ कुठल्यातरी कर्नाटकी लेखकांचा संदर्भ घेऊन व्हॉट्सअॅपवर फार महिन्यांपासून फिरत आहे.लोक माझ्याकडे स्पष्टीकरणासाठी येतात अशा हास्यास्पद आक्षेपांच्या स्पष्टीकरणाची गरज काय असावी? ज्या माणसाचे जीवन अगदी पारदर्शक आहे,ज्याच्या बाबतीत त्याने स्वत:नेच नाही तर शेकडो इतिहासकारांनी लिहिले आहे त्याच्यावर अशा पद्धतीने पूर्णपणे फसवे आक्षेप घेतले जातात तेही त्यांच्या आई-वडिलांपर्यंत जाऊन तुम्ही त्यांची मानहानी करताय.त्यांनी दोन-तीन मुद्दे एकत्र करून त्यावर एक काल्पनिक कथा उभी केली.आम्ही काय बसून फक्त या काल्पनिक कथांवर स्पष्टीकरण करत राहायचे का?” असा संतप्त सवाल तुषार गांधींनी केला.हा सगळा अजेंडा आरएसएसचा आहे.संभाजी भिडे फक्त एक सोंगाड्या आहे तो त्याला लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचतो त्याला हे सगळे टूलकिट नागपूरहून मिळते याची जाणीव असायला हवी.कारवाई करायचीच तर आरएसएसवर व्हायला हवी.संभाजी भिडे फक्त एक प्यादा आहे असेही तुषार गांधी म्हणाले.दरम्यान यावेळी बोलतांना तुषार गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली असून बापूंच्या चारित्र्याचे हनन करण्याची कथा जितकी खोटी आहे तेवढीच खोटी पंतप्रधानांची गांधीभक्ती आहे याची सगळ्यांना जाणीव असायला हवी.ते एक नाटक आहे.परदेशात स्वत:ची प्रतिमा चांगली करण्यासाठी गांधींचा उपयोग करून घ्यावा लागतो म्हणून ते हे सगळे करतात पण त्यांच्या हृदयात ही गांधीभक्ती नाही असे तुषार गांधी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.