अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३१ जुलै २३ सोमवार
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी अमरावतीत महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या अवमानजनक वक्तव्याच्या विरोधात कॉंग्रेस पक्ष आक्रमक झाला असून आमदार यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे. दरम्यान समाजमाध्यमावरून एका व्यक्तीने यशोमती ठाकूर यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
संभाजी भिडे यांच्या विरोधात जास्त बोललात तर दाभोळकर करू असा इशारा संबंधित व्यक्तीने दिला आहे.यशोमती ठाकूर यांनी सांगितले की आपल्याला जी धमकी देण्यात आली आहे त्याची जबाबदारी गृह विभाग,पोलीस यंत्रणा घेईल.समजा माझ्या जिवाचे बरेवाईट झाले तर हे धारकरी,भाजप,पोलीस विभाग तसेच भाजपचे खासदार डॉ.अनिल बोंडे हे जबाबदार राहतील असे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. आपण अशा धमक्यांना घाबरत नाही आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत असेही त्या म्हणाल्या.संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी अवमानजनक वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले.कॉंग्रेसने येथील राजकमल चौकात तीव्र निदर्शने केली होती. संभाजी भिडे यांना अटक न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला होता.