मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३ ऑगस्ट २३ गुरुवार
जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये हत्याकांड घडवणाऱ्या आरपीएफ जवान चेतन सिंह याच्या कृत्यामागे धार्मिक आकस कारणीभूत असल्याचे संकेत आतापर्यंतच्या तपासातून मिळत असून आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यावर गोळय़ा झाडल्यानंतर रेल्वेच्या डब्यातून पुढे जाताना चेतनने पेहरावानुसार हेरून मुस्लीम प्रवाशांवर गोळीबार केला तसेच अन्य एका प्रवाशाला त्याचे नाव विचारून त्याच्यावर गोळय़ा झाडल्याची माहिती समोर येत आहे.याबाबत आणखी तपास करण्यात येत असून त्यावेळी डब्यात असलेल्या अन्य प्रवाशांचीही चौकशी करण्यात येणार आहे.दरम्यान चेतन सिंह याने एक्स्प्रेसच्या ‘बी ५’ डब्यात आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक टिकाराम मीणा (५७) यांची गोळय़ा घालून हत्या केली त्यानंतर तो ‘एस ६’ डब्याकडे सरकला तेथे वाटेत दिसलेल्या अब्दुल मोहम्मद हुसे भानपुरवाला आणि असगर अब्बास अली यांच्यावर त्याने गोळय़ा झाडल्या.असगर शेवटच्या घटका मोजत असताना त्याच्या छातीवर पाय ठेवून चेतन याने धार्मिक द्वेषाची विधाने केली एवढेच नव्हे तर मृतांपैकी तिसरा प्रवासी सैफुद्दीन मैनुदीद (४३) हा ‘बी २’ मध्ये बसला होता त्यावेळी चेतनने बंदूक रोखून त्याला नाव विचारले आणि त्यानंतर त्याला आधी ‘बी १’ डब्यात आणि पुढे ‘पँट्री कार’पर्यंत नेले व तेथे त्याला गोळय़ा घातल्या अशी माहिती समोर आली आहे.त्याने असे का केले? याचीही पोलीस चौकशी करत आहेत मात्र यासंदर्भात रेल्वे पोलिसांनी अद्याप अधिकृत खुलासा केलेला नाही. दरम्यान गोळीबार झालेल्या तीन डब्यांत प्रत्येकी ७२ प्रवासी होते या सर्व प्रवाशांपर्यंत पोहोचण्याचे काम तपास यंत्रणांनी हाती घेतले आहे. अन्य डब्यांतील प्रवाशांकडेही चौकशी करण्यात येत आहे.प्रवासी स्वत:हून पुढे येत नसल्याने त्यांना विश्वासात घेतले जात आहे.काल दि.२ ऑगस्ट बुधवार रोजी अशा २० प्रवाशांची चौकशी करण्यात आली आहे.
सदरहू रेल्वेगाडीत गोळीबार झाला तरीही प्रवासी शांत का बसले? असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे.आरोपी चेतन सिंह हा आरपीएफच्या गणवेशात होता त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण नव्हते किंबहुना ही काही अधिकृत कारवाई सुरू आहे असा गैरसमजही अनेकांचा झाला.अनेकवेळा सुरक्षा पथकाचे ‘मॉक ड्री’ सुरू असते त्यामुळे हादेखील त्याचाच प्रकार असावा असा प्रवाशांचा समज झाला.चेतन सिंह हा धार्मिक द्वेषपूर्ण विधाने करत असतानाची ध्वनीचित्रफित खरी असल्याचे तपासात आढळले आहे.दि.३१ जुलै रोजी ही घटना घडल्यानंतर काही वेळातच ही चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारीत झाली होती.सुरुवातीला ती बनावट असल्याचे बोलले जात होते मात्र त्यात कोणतीही छेडछाड झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.