मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३ ऑगस्ट २३ गुरुवार
मणिपूर आणि हरियाणामध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावरून त्या ठिकाणी डबल इंजिनचे सरकार आहे की नाही असा प्रश्न पडतो. मणिपूरमध्ये राज्यपाल महिला आहेत तसेच या देशाच्या राष्ट्रपती महिला असतांना महिलांवरील अत्याचार वाढला आहे.भाजप सरकार चालवू शकत नाही हे अनेक घटनांवरून दिसून येत आहे.देशात सध्या घडणाऱ्या घटनांवरून हे हिंदू राष्ट्र नाही आणि रामराज्यही नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातील भाषणातील बारकावे पाहण्यासारखे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.सध्या भविष्याकडे न पाहता इतिहासात गुंतवून ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे भविष्यापासून सर्वाना दूर केले जात असून हे कृत्य देशाला मारक आहे. संभाजी भिडेंबद्दल योग्य अयोग्य काय आहे हे शासनाने ठरवावे आणि ठाम भूमिका घ्यावी असे स्पष्ट मत ठाकरे यांनी व्यक्त केले.संभाजी भिडे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुजी म्हणत असतील तर ते बोलतात ते सर्वच बरोबर आहे असे म्हणावे लागेल.गुरुजींनी विद्यार्थ्यांना तरी चांगले धडे देण्याची गरज आहे असा टोला ठाकरे यांनी फडणवीस यांचे नाव न घेता मारला आहे.