सादिक शेख,पोलीस नायक
मोताळा तालुका (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील धामणगाव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रोहिणखेड येथील कुटुंबाने बालविवाह केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी बालविवाह कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील कारवाईमुळे बालविवाह करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे तरीसुद्धा अनेक बालविवाह होत असतात परंतु काही बालविवाह करणाऱ्यावर पोलीस प्रशासनाला कारवाई करणे शक्य होत नाही.सदरहू दि.३ जुलै गुरुवार रोजी मोताळा तालुक्यातील रोहीणखेड येथील एका मंदिरावर बुलढाणा तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह शिवाजी विलास गायकवाड वय १९ वर्षे याच्यासोबत मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतांना सुद्धा मागील महिन्यात विवाह लावून देण्यात आला होता. याप्रकरणी दि.३ जुलै गुरुवार रोजी रोहिणखेड ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वैराळकर यांच्या फिर्यादी वरून धामणगाव बढे पोलिसांनी नवरदेव शिवाजी विलास गायकवाड व त्यांचे वडील विलास बाबुराव गायकवाड व आई प्रमिलाबाई विलास गायकवाड सर्व राहणार रोहिणखेड यांच्यावर धामणगाव बढे पोलीस स्टेशन अप.क्र२२२/२०२३ कलम९.१०.११ बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे हे करीत आहे.