Just another WordPress site

“सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करून हा निर्णय न्याय आणि लोकशाहीचा विजय”-राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी मिळाल्यानंतर काँग्रेसकडून जल्लोष

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.७ ऑगस्ट २३ सोमवार

 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांच्यावरील बंदी उठवली आहे.काँग्रेस पक्षाने यानंतर ‘द्वेषावर प्रेमाचा विजय’ अशा आशयाचे ट्वीट केले आहे.काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विटरवर लिहिले आहे की,सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे देशातील जनतेला आणि विशेषकरून वायनाड लोकसभा मतदारसंघाला मोठा दिलासा मिळाला आहे.भाजपा आणि मोदी सरकारचा जो काही कार्यकाळ उरला आहे त्यात त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य करून लोकशाहीला बदनाम करण्याऐवजी प्रत्यक्ष राज्यकारभारावर लक्ष केंद्रित करायला हवे.काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करून हा निर्णय न्याय आणि लोकशाहीचा विजय असल्याचे म्हटले.राहुल गांधी यांची खासदारकी पुन्हा बहाल करणे हा सर्वांत मोठा दिलासा आहे.आता ते वायनाड लोकसभा मतदारसंघ आणि भारतातील नागरिकांप्रति आपली जबाबदारी पार पाडू शकतील असे थरूर यांनी पुढे म्हटले.

दिल्लीमधील सोनिया गांधी यांचे निवासस्थान १० जनपथ येथे आज दि.७ ऑगस्ट सोमवार रोजी ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांनी एकत्र येऊन राहुल गांधी पुन्हा लोकसभा सभागृहात जाणार असल्याचा जल्लोष साजरा केला.महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या निर्णयाचे स्वागत केले.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे इंडिया आघाडीला आणखी मजबुती मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तर शिवसेना (उबाठा) पक्षाचे लोकसभेतील खासदार अरविंद सावंत यांनी राहुल गांधी यांना पुन्हा लोकसभेत घेण्याच्या निर्णयाचे स्वागत केले तसेच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला जोरदार चपराक लगावली असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलतांना अरविंद सावंत म्हणाले की,देशाचे स्वातंत्र्य धोक्यात असून राहुल गांधी यांना पुन्हा लोकसभेत घेण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.केंद्र सरकारच्या कुटील कारस्थानावर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार चपराक लगावली आहे.दरम्यान संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलतांना म्हणाले की,सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी तत्काळ निर्णय घेतला त्याप्रमाणे आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांची (राहुल गांधी) खासदारकी पुन्हा बहाल केली आहे.मागच्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने फौजदारी स्वरूपाच्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती त्यामुळे त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व पुन्हा बहाल केले जाईल अशी शक्यता वर्तविली जात होती.राहुल गांधी लोकसभेत केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.