“आमदार अपात्रतेचा निकाल लवकर लागू नये म्हणून योजना तयार केल्या जात आहेत”-कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांचा आरोप
शिवसेनेत बंडखोरी केलेल्या आमदारांची सुनावणी लवकरच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार असून ५६ दिवस ५६ आमदारांची बाजू राहुल नार्वेकर ऐकणार आहेत व त्यानंतर राहुल नार्वेकर आपला निर्णय जाहीर करू शकतात.परंतु कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप केला आहे.आमदार अपात्रतेचा निकाल लवकर लागू नये म्हणून योजना तयार केल्या जात आहेत असे असीम सरोदे यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलतांना म्हटले आहे.असीम सरोदे म्हणाले,सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्या प्रकरणी १४१ पानांचा निकाल दिला होता त्यात परिच्छेद ११० आणि १११ मध्ये रिझनेबल टाईममध्ये ( ठराविक वेळेत ) याप्रकरणाचा निर्णय घ्यावा असे म्हटले आहे पण रिझनेबल टाईम किती दिवस? किती वेळ? असे सांगितले नाही त्याचा गैरफायदा घेतला जात आहे ही संवैधानिक अनैतिकता आहे तसेच मणिपूरमधील के.मेघचंद्र विरुद्ध विधानसभा अध्यक्ष आणि राजेंद्र सिंह राणा प्रकरणात न्यायालयाने स्पष्ट केले आहे की,सामान्य परिस्थिती असेल तर ३ महिन्यांत निकाल दिला पाहिजे.गुंतागुंतीची परिस्थिती असेल तर ३ महिने आणि सामान्य परिस्थिती असेल तर ३ महिन्यांमध्ये निकाल लागला पाहिजे मात्र १६ आमदारांच्या संदर्भात कोणतीही गुंतागुंतीची परिस्थिती नाही असे असीम सरोदे यांनी सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर कार्यवाही करण्याचे काम राहुल नार्वेकरांना करायचे होते परंतु कोणतेही काम राहुल नार्वेकरांनी केलेले नसून नार्वेकरांनी वेळकाढूपणासाठी शिवसेनेची मूळ घटना अभ्यास करायची आहे असे सांगून निवडणूक आयोगाकडे त्याची मागणी केली.तसेच घटनेचा अभ्यास करण्याचा विधानसभा अध्यक्षांचा काही संबंधच नाही असे असीम सरोदेंनी स्पष्ट केले आहे.भरत गोगावले यांची प्रतोदपदी आणि एकनाथ शिंदे यांची राहुल नार्वेकरांनी गटनेतेपदी केलेली निवड बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने सांगितले.सुनील प्रभू शिवसेनेचे प्रतोद आहेत त्यांनी काढलेल्या व्हीपवर राहुल नार्वेकरांनी काय कार्यवाही केली? व्हीपच्या विरुद्ध कार्यवाही करणारे सर्वजण अपात्र आहेत याचा अर्थ १६ आमदार अपात्र आहेत त्यानंतर बाकीचे गेलेले आमदारही पक्षविरोधी कारवाई केल्याने अपात्र ठरतात असे असीम सरोदे म्हणाले.वेळकाढूपणासाठी १६ आमदारांचे १६ वकील आणले जातील मग उद्धव ठाकरे गटाचे मत ऐकून घेतले जाईल असे सरोदेंनी म्हटले आहे.