Just another WordPress site

“अजित पवार वारंवार शरद पवारांना भेटतात हा एक साथीचा आजार आहे”- ठाकरे गटाचे जोरदार टीकास्त्र

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ ऑगस्ट २३ सोमवार

गृहमंत्री अमित शहा पुण्यात आले व त्या भेटीत महाराष्ट्रातील नेतृत्व बदलाच्या दृष्टीने गुप्त खलबते झाल्याची गुप्त बातमी फुटल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचा आजार बळावला तसेच त्यांच्या गटाच्या लोकांनी हा आजार गांभीर्याने घेतला पाहिजे.खरे तर हा रोग महाराष्ट्राला लागला आहे व अशा रोगाचे लवकरात लवकर उच्चाटन होईल तेवढे बरे.दोन पवारांची ‘गंमतभेट’ व मुख्यमंत्र्यांचा वाढता आजार हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु महाराष्ट्र म्हणजे ‘गंमत जंमत’ नाही अशा शब्दांत शिवसेनेने ( ठाकरे गट ) ‘सामना’ अग्रलेखातून सुनावले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीस वारंवार जात आहेत व शरद पवार या भेटी टाळत नाहीत हे गंमतीचे आहे.काही भेटी उघडपणे झाल्या तर काही गुप्तपणे झाल्याचे म्हटले जात आहे त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो असा संभ्रम निर्माण व्हावा यासाठीच भाजपाचे देशी चाणक्य अजित पवारांना अशा भेटीसाठी ढकलून पाठवतायत काय? या शंकेला बळ मिळत आहे.अर्थात अजित पवारांच्या अशा भेटीने संभ्रम होईल,वाढेल यापलीकडे जनतेची मने पोहोचली आहेत.या रोजच्या खेळाने मनास एक प्रकारची बधिरता आली आहे व त्यास सध्याचे राजकारण जबाबदार आहे असेही ठाकरे गटाने म्हटले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की,महाराष्ट्रातील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्रीपदावर डोळा आहे.राज्यातील सरकार हे ‘गंमत जंमत’ सरकार आहे.नाना पटोलेंच्या वक्तव्याशी आम्ही सहमत आहोत पण त्यात थोडी भर टाकून सांगतो पवार काका-पुतण्यांच्या अलीकडच्या भेटीचा प्रकारसुद्धा गंमत जंमत ठरत आहे.नक्की कुणावर हसावे व कुणावर चिडावे हे महाराष्ट्राला कळेनासे झालेय.शरद पवार यांची प्रतिमा अशा भेटीने मलिन होते व ते बरे नाही असा सल्लाही ठाकरे गटाने दिला आहे.अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह भाजपची वाट धरल्यावर सगळ्यात मोठी गंमत झाली ती एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाची.आता तर शिंदे आजारी पडले असून त्यांची प्रकृती खूपच खालावली आहे व त्यांना जबरदस्तीने इस्पितळात दाखल करू असे शिंदे यांचे समर्थक आमदार संजय शिरसाट यांनी जाहीर केले.एकनाथ शिंदे हे २४ तास काम करतात म्हणून ते आजारी पडले पण शिंदे २४ तास काम करतात ते महाराष्ट्रात कोठेच दृष्य स्वरूपात दिसत नाही.कधीही पद गमवावे लागेल या भीतीतून त्यांची झोप उडाली असेल तर त्यास २४ तास काम करणे असे म्हणता येत नाही असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.शिंदे यांची झोप उडाली की ते ऊठसूट हेलिकॉप्टरने साताऱ्यातील त्यांच्या शेतावर आराम करतात म्हणजे ‘२४ तास काम व पुढचे ७२ तास आराम’ असे त्यांच्या जीवनाचे गणित दिसते व शिंदे यांच्या आजाराचे खापर अजित पवार यांच्यावर फोडले जाते.अजित पवार सरकारात घुसल्यावर शिंदे व त्यांच्या गटाच्या हृदयाचे ठोके वाढले आणि मन अस्थिर झाले त्यात अजित पवार हे अधूनमधून शरद पवारांना भेटू लागल्याने या सगळ्यांच्याच लहान मेंदूस त्रास सुरू झाला पण त्यासाठी दूर साताऱ्यात जाऊन सततच आराम करणे हा उपाय नाही असा टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे.

मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्मास आलेले नाही.‘मी पुन्हा येणार’वाल्यांनाही ‘उप’ वगैरे होऊन उपऱ्यांच्या पखाली वाहाव्या लागत आहेत पण शिंदे यांना वाटते शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आपणच पण अजित पवारांमुळे त्यांच्या श्वासनलिकेत अडथळे निर्माण झाले व त्यांना अलीकडे गुदमरल्यासारखे होत आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांना नक्की काय त्रास होतोय? त्यांचा आजार किती खोलवर पसरलाय? आजाराचे मूळ काय? याबाबत आरोग्य मंत्र्यांनी विशेष बुलेटिन जारी केले तर बरे होईल असे ठाकरे गटाने म्हटले असून महाराष्ट्राच्या राजकारणास सध्या ज्या आजाराने ग्रासले आहे त्या आजाराचा किडा मुख्यमंत्र्यांच्या शरीरात असून त्याचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर हा किडा महाराष्ट्राचे समाजमन पोखरून काढल्याशिवाय राहणार नाही.अजित पवार वारंवार शरद पवारांना भेटतात हा एक साथीचा आजार आहे व मुख्यमंत्री शिंदे आजारी पडून वारंवार विश्रांतीसाठी साताऱ्यातील शेतावर हेलिकॉप्टरने उतरतात हा महाराष्ट्रास लागलेला मानसिक आजार आहे.या दोन्ही आजारांत गुप्त असे काहीच राहिलेले नाही असेही ठाकरे गटाने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.