पंकजा मुंडे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे स्पष्ट मत
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आपण पाच ते दहा वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्याचे नुकतेच वक्तव्य केले आहे.या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावला आहे.आत्ताच घ्या ना…पाच दहा वर्षे कशाला पाहिजे?या शब्दात एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे.चंद्रकांत पाटील यांचा पिंड राजकारणी नाहीये ते विद्यार्थी परिषदेचे काम करीत होते.त्यांचा राजकारणाशी फारसा संबंध नव्हता.गेल्या काळात पक्षाने त्यांच्यावर मोठ मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या.मात्र आता पक्षातले वातावरण त्यांना आवडले नसावे आणि अशा वातावरणात पुढच्या काळात राजकारण अवघड आहे असे त्यांच्या मनाला वाटले असेल. त्यामुळे राजकारणापासून वेगळे होण्याचा विचार त्यांच्या मनात आला असेल असे मत व्यक्त करत एकनाथ खडसेंनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर निशाना साधला.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत पंकजा मुंडे यांनी रक्ताची नाते कधी संपत नसतात असे नुकतेच मत व्यक्त केले आहे.त्यांनी त्यांच्याबाबत सकारात्मक मत मांडलेले आहे.परिणामी यावरून आगामी काळात पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा सुरू झाली आहे.यावरील प्रश्नाला एकनाथ खडसे यांनी उत्तर दिले आहे.पंकजा मुंडे यांनी काहीतरी वक्तव्य केले म्हणून सुतावरून स्वर्ग गाठण्याची गरज नाही.राजकारणात नातं जोपासले पाहिजे.त्यामुळे यातूनच पंकजा मुंडे या बोलल्या असाव्यात असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.धुळ्यात उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बैठक घेणाऱ्या कार्यकर्त्यांना विरोध करत घोषणबाजी केली. यावर एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली. दसरा मेळावा कोणाचा मोठा व्हायचा यावरून उद्धव सेना व शिंदे सेना यामध्ये चुरस वाढली आहे. यातूनच या दोघांचे एकमेकांवर हल्ले,शाब्दिक हल्ले असले प्रकार सुरू आहेत.याच माध्यमातून धुळ्यातील घटना घडली असावी असे मत एकनाथ खडसेंनी व्यक्त केले आहे.