अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयातील कोतवाल बुक विभागाला आग;घातपाताची शक्यता
अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची शक्यता
अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२२ ऑगस्ट २३ मंगळवार
जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी शहर तहसील कार्यालयातील कोतवाल बुक नक्कल असलेल्या विभागाला दि.२० ऑगस्ट रविवार रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याचे उघडकीस आले आहे.सदरील घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून कुणीतरी अज्ञात व्यक्तीकडून आग लावल्याची शक्यता वर्तविली जात आहे.त्याचबरोबर घातपाताचीही शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.
याबाबत प्राप्त माहितीनूसार अधिक वृत्त असे की,दि.२० ऑगस्ट रोजी रविवार असल्यामुळे सदरील तहसील कार्यालय बंद होते.दरम्यान सकाळी दहा वाजताच्या सुमारास तहसील कार्यालयापासून वेगळ्या असलेल्या कोतवाल बुक नक्कल विभागाच्या खोलीतून काही लोकांना धूर निघतांना दिसून आल्यानंतर येथे आग लागल्याचे निष्पन्न झाले.सदरील आग नेमकी केव्हा लागली? तसेच कोणी लावली?कि कशी लागली? या विविध प्रश्नांचा अद्यापि अंदाज घेता आला नसून या खोलीत असलेले महत्त्वाच्या दस्तऐवजासह २०२० मध्ये निकाली निघालेल्या केसेस तसेच तेथील लाकडी फर्निचर जळाल्याची माहिती नायब तहसीलदार रवींद्र काळे यांनी दिली आहे.तहसील कार्यालयाला कायमस्वरूपी चौकीदार नसल्यामुळे रात्रीला कार्यालयात कुणीही नसते तसेच जळालेल्या खोलीच्या खिडकीच्या काचा फुटलेल्या असून त्यामुळे कोणत्यातरी समाजकंटकाने हा अनुसूचित प्रकार घडवला असल्याचा अंदाज वर्तविला आहे.दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.पी.पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली असून त्या ठिकाणच्या खिडकीच्या काचा फुटलेल्या आढळल्या असून तहसील कार्यालयाने तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.