अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२४ ऑगस्ट २३ गुरुवार
दर्यापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सुकळी येथे काल दि.२३ ऑगस्ट बुधवार रोजी ग्रामसभा संपन्न झाली.सदरील ग्रामसभेत सुकळी येथील रहिवाशी पंचफुला विनायक धांदे विधवा महिला असून साधारण आठ वर्षांपासून रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलाची मागणी करीत आहे. आपल्याला घरकुल मिळावे यासाठी सदरील महिलेने पंचायत समिती दर्यापूर येथील संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार भेटून तिला सुकळी येथील रोजगार सेवक यांना भेटण्यास सांगितले.सुकळी येथील रोजगार सेवकांना भेटल्यावर रोजगार सेवकांनी सांगितले की,तुला जर घरकुलचा लाभ ग्यायचा असेल तर मला पंचवीस हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा तुझे काम होणार नाही असे विधवा महिला पंचफुला विनायक धांदे यांनी आपल्या कैफियतीमध्ये म्हटले आहे.
काल दि.२३ ऑगस्ट बुधवार रोजी सुकळी येथील ग्रामसभेत सदर महिलांनी पुन्हा घरकुलाची मागणी केली असता ग्रामपंचायत सरपंच बबीता सुधीर चक्रनारायण यांनी तिला तू ग्रामपंचायत मधून निघून जाणेबाबतची तंबी भरून हिनपणाची वागणूक सरपंचांकडून देण्यात आली तसेच सदरील प्रकरण इथेच थांबले नसून सदर रोजगार सेवकाचा सख्खा चुलत भाऊ निलेश मधुकर चक्रनारायण यांना सुद्धा दहा हजाराची घरकुलाकरिता मागणी केली असल्याचे रोजगार सेवकाचा सख्खा चुलत भाऊ निलेश मधुकर चक्रनारायण यांच्याकडून सांगण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरपंच व त्यांचे पती या दोघांनी सुद्धा घरकुलाचा लाभ घेतला असल्याचे समजते.मात्र इतर गावकऱ्यांना घरकुलाचा लाभ घेण्याकरिता मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार गावकरी वर्गातून केली जात आहे.यापूर्वी सुद्धा घरकुलाच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात अनेक बातम्या प्रकाशित करण्यात आल्या असूनसुद्धा या घरकुलाच्या भ्रष्टाचाराला आळा बसतांना दिसत नसल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.तरी संबंधित अधिकाऱ्यांनी तूर्त लक्ष पुरवून सदरील समस्या सोडवून सदरील लाभार्थ्यांना घरकुलाचा तात्काळ लाभ देण्यात यावा अशी आग्रही मागणी गावकरी वर्गातून केली जात आहे.