Just another WordPress site

खल्लार येथील माऊली रेस्टॉरंट संचालकाच्या कुटुंबाला झोपेतच जाळून मारण्याचा कट फसला

आमदार बळवंत वानखडे यांची घटनास्थळी भेट;खल्लार पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध

अनिल गौर,पोलीस नायक

अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.२८ ऑगस्ट २३ सोमवार

दर्यापूर तालुक्यातील खल्लार येथील स्टॉपवरील वास्तव्यात असलेल्या माऊली रेस्टॉरंटचे संचालक वानखडे कुटुंबाला मध्यरात्रीच्या सुमारास घरात पेट्रोल टाकत व आग लावून झोपेतच जीवे मारण्याचा कट अज्ञात व्यक्तीने केला असून नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवित हानी टळली आहे.यात ५ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जळून खाक झाला असून सदरील घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान आमदार बळवंत वानखडे यांनी घटनास्थळी जाऊन वानखडे कुटुंबाचे सांत्वन करून घटनेचा आढावा घेतला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील दर्यापूर आसेगाव मार्गावर असलेल्या खल्लार स्टॉपवर पंडितराव वानखडे राहणार गौरखेडा यांचे माऊली रेस्टॉरंट असून याच रेस्टॉरंटच्या इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर वानखडे कुटुंबाचे वास्तव्य आहे.दरम्यान दि.२६ ऑगस्ट शनिवार रोजी रात्री ११ वाजता माऊली रेस्टॉरंटच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर अचानक भीषण आग लागली यावेळी वानखडे कुटुंब झोपेत होते.मात्र स्टॉपवरील काही नागरिकांना हि आग दिसल्यामुळे त्यांनी आरडाओरडा केली असता वानखडे कुटुंब जागी झाले.यावेळी पंडितराव प्रल्हादराव वानखडे वय (५१)वर्ष,पत्नी लीना पंडितराव वानखडे वय (४०) वर्ष व मुलगा सुमित पंडितराव वानखडे वय (२२) वर्ष यांना गावकऱ्यांनी आगीच्या विळख्यातून बाहेर काढले त्यामुळे सुदैवाने मोठी जीवित हानी टळली आहे.प्रसंगी मध्यरात्रीच्या सुमारास दर्यापूर येथील अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.दरम्यान सदरील आगीत घरातील संपूर्ण फर्निचर,कपाट,जीवनावश्यक वस्तू,मोबाईल,टीव्ही,कुलर,फॅन, दागिने व रोख रक्कम असा एकूण ५ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे.

दरम्यान दि.२७ ऑगस्ट रविवार रोजी सकाळपर्यंत घटनेची माहिती वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली.याबाबत पंडितराव वानखडे यांनी सदरील घटनेबाबत खल्लार पोलिसात अज्ञात आरोपी विरोधात तक्रार नोंदवली आहे.यावेळी आमदार बळवंत वानखडे यांनी घटनास्थळी भेट देऊन वानखडे कुटुंबाचे सांत्वन करून परिस्थितीचा आढावा घेतला.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गुरुनाथ नायडू,अमरावती ग्रामीणचे श्वान पथक,मोबाईल फॉरेन्सिक पथक,स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.याबाबत घटनास्थळाच्या आजूबाजूच्या दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराची पाहणी पोलिसांकडून करण्यात आली.सदरील चौकशी दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने वानखडे कुटुंबाच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावून वानखेडे कुटुंबाला झोपेतच मारण्याचा कट करीत असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पोलीस यंत्रनेपुढे मोठे आव्हान निर्माण झाले असून खल्लार पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीचा बारकाईने कसून शोध घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.