भुसावळ-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३ सप्टेंबर २३ रविवार
शहरातील कुख्यात गुन्हेगार निखील राजपूत याची काल पहाटेच्या सुमारास करण्यात आलेली क्रूर हत्या ही दुसरी-तिसरी कुणी नव्हे तर त्याच्या सख्ख्या शालकानेच केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,भुसावळ शहरात काल पहाटेच्या सुमारास तीन खुनांच्या बातम्यांनी शहर प्रचंड हादरला यात कंडारी येथे दोन सख्खे भाऊ हे प्राणघातक हल्ल्यात मरण पावले तर दुसरीकडे काही तासांमध्येच बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या हद्दीत कुख्यात गुन्हेगार निखील राजपूत याची अतिशय क्रूर हत्या करण्यात आली.भुसावळसह परिसरातील गुन्हेगारीच्या क्षेत्रात गेल्या दोन-तीन वर्षात निखील राजपूतची प्रचंड दहशत पसरली होती.खुनाचा प्रयत्न,प्राणघातक हल्ला,खंडणी व धमक्या देणे अशा अनेक प्रकरणांमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते मात्र तो अगदी पोलिसांना देखील जुमानत नव्हता.दरम्यान काल रात्री तो चमेली नगरातील आपल्या राहत्या घराजवळ पाण्याच्या टाकीच्या वरील भागास आपल्या सहकार्यांसह झोपला असतांना निखील राजपूत याच्यावर धारदार शस्त्राने वार झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता तर मारेकर वार करून घटनास्थळावरून तात्काळ फरार झाला होता.
याबाबत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून मारेकरी हा निखील राजपूतच्या चांगल्या परिचयाचा व्यक्ती असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. निखील हा पाण्याच्या टाकीवर झोपत असल्याची माहिती त्याला असल्याने त्याने टाकीवर चढून निखीलवर वार केले याप्रसंगी निखीलसोबत काही जण देखील होते मात्र त्यांना काही कळण्याच्या आतच मारेकर्याने पलायन केले.पोलिसांनी तपास केला असता सदर आरोपी हा निलेश चंद्रकांत ठाकूर वय २२,रा.कंडारी,ता.भुसावळ असल्याची माहिती मिळाली त्याला बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे.यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे निखील राजपूतचा खून करणारा आरोपी हा त्याचाच सख्खा शालक अर्थात पत्नीचा भाऊ असल्याची माहिती समोर आली असून निखीलने आधी आपल्या समाजातील तरूणीशी विवाह केला होता व तिला घटस्फोट दिल्यानंतर त्याने आंतरजातीय विवाह केला होता यानंतर तो आपल्या पत्नीला खूप त्रास देत असे तसेच त्याचे काही इतर महिलांशी विवाहबाह्य संबंध देखील होते यातून अनेकदा वाद देखील झाले होते व याच वादातून निलेश ठाकूर याने थेट आपल्या मेहुण्याचाच खून केल्याची बाब उघड झाली आहे.याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये सदरील आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.