Just another WordPress site

धामणगाव बढे बसस्थानकावर प्रवासी निवारा व स्वच्छतागृह बांधण्याबाबत अलीम कुरेशी यांची निवेदनाद्वारे मागणी

सादिक शेख,पोलीस नायक

मोताळा तालुका (प्रतिनिधी) :-

दि.७ सप्टेंबर २३ गुरुवार

तालुक्यातील धामणगाव बढे येथील बस स्थानकावर प्रवासी निवारा व स्वच्छतागृह नसल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याने संबंधितांनी तात्काळ याठिकाणी प्रवाशांकरिता निवारा व स्वच्छतागृह बांधून हि समस्या सोडवावी अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते अलीम कुरेशी यांनी जिल्हाप्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

मराठवाडा व खानदेश तसेच विदर्भाला जोडणाऱ्या धामणगाव बढे या बस स्थानकावर अजिंठा,बुलढाणा,जामनेर,औरंगाबाद,शेगाव,मोताळा, मलकापूर,नाशिक अशा विविध ठिकाणांहून बस ये-जा करीत असतात.सदरहू या ठिकाणी येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ होत असते.परंतु धामणगाव बढे या बसस्थानकावर प्रवासी निवारा व स्वच्छतागृह नसल्याने प्रवाशांना उन्हाळा,पावसाळा व हिवाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.गेल्या दीड वर्षांपूर्वी धामणगाव बढे ते वाघजाळ फाटा व धामणगाव बढे ते जामनेर या महामार्गाचे दुपटीकरण झाले त्यावेळेस रोडचे दुपटीकरण करतांना प्रवासी निवारा तोडण्यात आला असून गेली दीड वर्ष उलटल्यावरही कोणत्याही प्रकारे प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही.धामणगाव बढे हे २५ हजार लोकसंख्येचे गाव असून परिसरातील शेतकरी रोज बुलढाणा,जळगाव,औरंगाबाद,अकोला,नागपूर,नाशिक,भुसावळ,मलकापूर,मोताळा येथे व्यापारासाठी व शेतीमाल विक्रीसाठी तसेच विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी ये-जा करीत असतात.त्याचप्रमाणे येथून जवळच असलेल्या अजिंठा लेणी,गजानन महाराज मंदिर शेगाव,लोणार सरोवरासाठीही पर्यटक व जवळच असलेल्या जाळीचा देव येथे दर्शनासाठी भाविक येथूनच ये जा करिता असल्याने प्रवाशांची मोठी वर्दळ असते.परंतु या ठिकाणी प्रवासी निवारा व स्वच्छतागृह नसल्यामुळे प्रवाशांना हॉटेल समोर थांबून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.काही महिन्यापूर्वी धामणगाव बढे बस स्थानकावर एका व्यक्तीला भरधाव वाहनाची धडक लागून त्याच्या मृत्यूची घटना घडली होती तरीही प्रशासन कुंभकर्ण झोपेत असल्याचे दिसून येत आहे.येथे कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्यामुळे प्रवाशांना लघुशंका व निवाऱ्याकरिता नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची परिस्थिती धामणगाव बढे बसस्थानकावर निर्माण झालेली आहे.तरी प्रशासनाने सदरील बाबींची गांभीर्याने दखल घेऊन धामणगाव बढे बसस्थानकावर तात्काळ प्रवासी निवारा व स्वच्छतागृह निर्माण करून प्रवाशांचे हाल थांबवावे अशी मागणी धामणगाव बढे येथील सामाजिक कार्यकर्ते अलीम कुरेशी व धामणगाव बढे वासियांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.