जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१४ सप्टेंबर २३ गुरुवार
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये गाय व बैल या जनावरांमध्ये लम्पी स्किन डिसीज या साथ रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असून या पार्श्वभूमीवर आज दि.१४ सप्टेंबर गुरुवार रोजी साजरा करण्यात येणारा बैल पोळा हा सण पशुपालक शेतकऱ्यांनी सार्वजनिकरित्या मिरवणूक काढून साजरा न करता बैलांची गोठ्यातच पूजा करून साजरा करण्यात यावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.श्यामकांत पाटील यांनी केले आहे.
पशुसंवर्धन विभागामार्फत लम्पी आजरावर उपचार तसेच प्रतिबंधात्मक उपाय व्यापक प्रमाणावर राबविण्यात येत असून सद्यस्थितीत जिल्ह्यात लम्पीमुळे बैल मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जवळपास ६० टक्के असल्याने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.दरम्यान बैलपोळा हा सण पशुपालकांच्या जिव्हाळयाचा सण आहे मात्र आपल्या बैलाचे लम्पी स्कीन या संसर्ग आजारापासून संरक्षण व्हावे तसेच आजाराची लक्षणे होवू नये याकरिता पशुपालकांनी पोळा हा सण सार्वजनिकरित्या मिरवणूक काढून साजरा न करता बैलांची पुजा गोठयातच करून साजरा करावा. परिणामी जनावरांमध्ये लम्पी सदृश लक्षणे दिसून आल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी तात्काळ संपर्क साधून उपचार करून घ्यावा. लम्पी स्किन आजार जरी संसर्गजन्य असला तरी सदरील रोगाचे निदान लवकर झाल्यास तसेच योग्य उपचार त्वरीत करून घेतल्यास सदर आजार हा ८ ते १० दिवसात पूर्णपणे बरा होतो.सद्यपरीस्थितीत जिल्हयाभरात उपचाराअंती आजार बरा होण्याचे प्रमाण ९५ टक्के असल्यामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता शासकीय यंत्रणे मार्फत उपचार करून घ्यावे त्याच बरोबर जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या सहकार्याने गोठा स्वच्छता व गोचिड निर्मूलन करून लम्पि आजार निर्मूलनाकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेकरीता प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.श्यामकांत पाटील यांनी केले आहे.