यंदा नोव्हेंबर २३ ते जुलै २४ पर्यंत ६६ मुहूर्तांचा योग : यात ४४ गोरज मुहूर्त-पंचाग अभ्यासक डिगंबर जोशी
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ सप्टेंबर २३ गुरुवार
मुहूर्त न पाहता लग्न केले तर भविष्यात अडचणी येतात अशी आजच्या घडीला समज झाली असल्याचे आपणाला पाहायला मिळत आहे. परिणामी जे लोक नवीन वर्षात लग्न करण्याचा विचार करत आहेत अशा लोकांनी नवीन शुभ मुहूर्ताबाबत जाणून घेणे गरजेचे आहे.दिवाळी आली की वधू-वराकडील मंडळी लग्नाच्या तयारीला लागतात व तुळशी विवाह झाल्यानंतर विवाह सोहळ्यांना सुरुवात केली जाते.
यंदा अधिक मासामुळे दिवाळी लांबल्याने लग्न मुहूर्तही लांबले आहेत मात्र नोव्हेंबर महिन्यापासून अनेक मुहूर्त असून विवाह हंगामाचा श्रीगणेशा नोव्हेंबर महिन्यापासून सुरु होणार आहे.याबाबत प्रसिद्ध पंचाग अभ्यासक डिगंबर जोशी यांनी सांगितले आहे की नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ पर्यंत ६६ मुहूर्त असून यात गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी आठ मुहूर्त अधिक आहेत व यातील ४४ मुहूर्त हे गोरज मुहूर्ताचे आहेत.दरम्यान वैशाख महिन्यात लग्न करू इच्छिणाऱ्यांचा यंदा या महिन्यात एकही मुहूर्त नसल्याने हिरमोड झाला आहे.खऱ्या अर्थाने विवाह मुहूर्ताचा श्रीगणेशा हा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात २७,२८,२९ या तारखांना विवाह मुहूर्त होणार आहे.तसेच डिसेंबर महिन्यात ६,८,१५,१७,२०,२१,२५, २६ आणि ३१ तर जानेवारी २०२४ मध्ये २,६,८,१७,२२,२७,२९,३० आणि ३१ या तारखांना विवाह मुहूर्त आहे.वैशाख महिन्यात जास्त शुभ मुहूर्त असतात त्यामुळे कडक उन्हात लग्नांची धूम असते मात्र यावर्षी ३ मे २०२४ ते २८ जून २०२४ पर्यंत लग्नासाठी एकही मुहूर्त नाही त्यामुळे ५६ दिवस मंगल कार्यालये तसेच लग्नकार्याशी संबंधित व्यावसायिकांना घरी बसून राहण्याची वेळ येणार आहे.परिणामी नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत लग्नाचे एकूण ६६ मुहूर्त आहे.मागील वर्षापेक्षा यंदा आठ मुहूर्त अधिक असून वधू-वराकडील मंडळींची लगबग सुरू झाली असून मंगल कार्यालयांचे बुकिंग करण्याची कामे सुरू झाली आहेत.तर काही लोकांना गोरज मुहूर्तावर लग्न करण्याची इच्छा असते अशांसाठी नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ मध्ये एकूण ४४ गोरज मुहूर्त आले आहेत त्यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे परिणामी दिवाळीनंतर लग्नाची धामधूम सुरू होणार आहे.