यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२८ सप्टेंबर २३ गुरुवार
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत प्र.प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.ए.पी.पाटील हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार होते.सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.डी.पवार यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे ध्येय व उद्दिष्ट विशद करून केले.तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार यांनी आपल्या मार्गदर्शनात आपला भारत देश हा विविध संस्कृती,भाषा,धर्म यांनी नटलेले राष्ट्र आहे परिणामी आपण आपल्या राष्ट्राचा अभिमान बाळगून निस्वार्थपणे सेवा केली पाहिजे तसेच युवकांनी सेवा करतांना स्वतःला झोकून दिले पाहिजे त्यामुळे इतर युवकांना प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन त्यांनी केले.उपप्राचार्य प्रा.ए.पी.पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महात्मा गांधींनी सांगितल्याप्रमाणे खेड्याकडे चला यामुळे ग्रामीण भागाचा विकास होऊन ग्रामीण भाग स्वावलंबन होईल त्यामुळे ग्रामीण व शहरी भागाची दरी भरून निघेल तसेच स्वयंसेवकांनी स्वावलंबन व स्वयंशिस्त हे दोन गुण अंगीकारून समाजामध्ये वेगळी ओळख निर्माण करणे गरजेचे आहे असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पी.व्ही.रावते यांनी केले तर आभार प्रा.नरेंद्र पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.एच.जी.भंगाळे,डॉ.पी.व्ही.पावरा,प्रा.पी.व्ही.सपकाळे,प्रा.सि.टी.वसावे,प्रा.सुभाष कामडी,डॉ.संतोष जाधव, प्रा.एन.डी.बोदडे,प्रा.अर्जुन गाढे यांनी सहकार्य केले.