शिरसाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची यशोगाथा एनआयईपीएमार्फत राष्ट्रीय पोर्टलवर
राज्यभरातील शाळांमधून यश मिळवत शिरसाड शाळेची गरुड भरारी
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.७ ऑक्टोबर २३ शनिवार
तालुक्यातील शिरसाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेची यशोगाथा राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (एनआयईपीए) मार्फत राष्ट्रीय पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील ‘शिक्षणातील प्रकाशवाटा’ ही राज्यभरातील शाळांच्या यशोगाथा संकलित केलेली पुस्तिका एनआयईपीएच्या लिंकवर उपलब्ध करण्यात आली आहे.यानिमित्ताने शाळेची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आल्याने अधिकारी तथा ग्रामस्थ यांच्या वतीने शाळेचे कौतुक करण्यात येत आहे.यानिमित्ताने शाळा व्यवस्थापन समितीच्या पुनर्गठन कामी आयोजित केलेल्या पालक सभेत आणि केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये तत्कालीन मुख्याध्यापिका संगिता धनंजय पाटील आणि शिक्षक वृंद यांचा जाहीर सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.सदरहू यापूर्वी देखील संपुर्ण जगावर आलेल्या कोविड संकटाच्या काळामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्यामार्फत प्रसिध्द झालेल्या जिल्ह्यातील ‘उपक्रमशील शाळा’ या पुस्तिकेमध्ये शाळेची यशोगाथा प्रसिध्द करण्यात आली होती हे विशेष !
गेल्या मार्च महिन्यात महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था औरंगाबाद अर्थात एनआयईपीए मार्फत राज्यातील शाळांच्या यशोगाथा प्रस्ताव मागविण्यात आले होते.यात राज्यभरातील मुख्याध्यापक ते राज्यस्तर अधिकाऱ्यांचे सक्षमीकरण करणे,राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था नवी दिल्ली (निपा) यांनी निर्देशित केल्याप्रमाणे शालेय नेतृत्व विकास संदर्भातील कार्यक्रम कार्यान्वित करणे ही शैक्षणिक नियोजन व्यवस्थापन व प्रशासन संस्था औरंगाबाद या संस्थेची उद्दिष्टे आहेत.सदरहू वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार शिरसाड शाळेची यशोगाथा महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था औरंगाबाद यांच्याकडे पाठविण्यात आली होती.दरम्यान संपूर्ण यशोगाथा शब्दांत मांडून संकलित करण्याचे काम शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक दीपक वसंतराव चव्हाण यांनी केले होते.एमआयईपीएकडे प्राप्त सर्व यशोगाथा या एनआयईपीएकडे पाठविण्यात आल्या आणि सर्व राज्यातील आलेल्या यशोगाथा राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था एनआयईपीए मार्फत राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत परिणामी शिरसाड शाळेसाठी नक्कीच ही कौतुकास्पद बाब ठरली आहे.
मागील वर्षीही शाळेस जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असून तालुकास्तरीय परसबाग स्पर्धेतही प्रथम क्रमांक मिळाला होता.शाळेने मागील पाच वर्षांमध्ये आठ लाखापर्यंत लोकसहभाग मिळवून केलेल्या भौतिक सुविधांमध्ये सुधारणा तथा राबवलेले विविध उपक्रम,तंत्रज्ञानाचा शालेय प्रशासनामध्ये तथा अध्ययन-अध्यापनामध्ये केलेला प्रभावी वापर,शाळेची नाविन्यपूर्ण उपक्रम याविषयी सविस्तर माहिती सदर यशोगाथेमध्ये देण्यात आली आहे.सदरहू याचे सर्व श्रेय शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक रविंद्र शामराव पाटील यांनी शाळेच्या तत्कालीन मुख्याध्यापिका संगिता धनंजय पाटील,शाळेतील शिक्षक वृंद तथा शाळा व्यवस्थापन समिती यांना देऊन सर्वांचे अभिनंदन केले आहे.यापुढेही सर्वांच्या सहकार्याने शाळेमध्ये सकारात्मक बदल व्हावेत यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत यावेळी शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक रविंद्र शामराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.दरम्यान साकळी केंद्राचे केंद्रप्रमुख किशोर चौधरी,यावल गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी शाळेचे अभिनंदन केले आहे.सदरहू संगिता धनंजय पाटील यांनी शाळेचे कर्तुत्ववान माजी विद्यार्थी,केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी,डाएटचे सन्माननीय अधिकारी तथा एमआयईपीए आणि एनआयईपीए यांच्यासोबत शाळेत त्यावेळी कार्यरत असलेले उपशिक्षक राजाराम मोरे,राजेंद्र अटवाल,दीपक चव्हाण,शेख महबूब,किशोर पाटील,अविनाश पाटील,अर्चना शिंदे या सर्व शिक्षकांचे आभार मानले आहे.