सातपुड्याच्या जंगलातील आदिवासींचे पीक नुकसान वन विभागाच्या आकसबुद्धीने
लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा व आदिवासींच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांचा आरोप
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-जळगाव जिल्ह्यातील सातपुड्याच्या जंगलातील रावेर तालुक्यात कुसूंबा व लोहार या शिवारात तब्बल १२० आदिवासी शेतकऱ्यांच्या एकूण ४०० एकर शेतजमींनीवरील सोयाबीन तसेच ज्वारी या पिकांवर यावल वनविभागाने जेसीबी फिरवून कारवाई केली आहे.संबंधित आदिवासी शेतकरी हे वनदावेदार असल्याबाबतचे त्यांच्याकडे पुरावे सुध्दा आहेत अशा आदिवासींवर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करु नये असे आदेश असतांनाही वनविभागाने आकसबुध्दीतून ही कारवाई केल्याचा आरोप लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा व आदिवासींच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी केला आहे.संबंधितांवर कारवाई करुन आदिवासींना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.दरम्यान वनविभागाच्या कारवाईने आदिवासीचे हातची पिके गेले असून त्यांच्यासमोर उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न आता उपस्थित राहिला आहे.
रावेर तालुक्यातील कुसूंबा व लोहार या गावात तसेच यावल तालुक्यातील सावखेडा या गावात गेल्या ४० ते ५० वर्षांपासून आदिवासी बांधव वास्तव्यास आहेत.या आदिवासी बांधवांकडे अनेक वर्षांपासून शेती करत असल्याचे तसेच ते वनदावेदार असल्याचे पुरावे सुध्दा आहेत.तर दुसरीकडे संबंधित गावांमधील ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेवून या आदिवासी शेतकऱ्यांना शेती करण्यास मंजुरी सुध्दा दिली आहे.त्यानुसार हे आदिवासी शेतकरी स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी शेती करत असतात.यावेळी कुसूंबा लोहारा गावातील तब्बल १२० शेतकऱ्यांनी ४०० एकर जमीनीवर सोयाबीन तसेच ज्वारी पिकाची लागवड केली आहे.या आदिवासींवर शनिवारी यावल वनविभागाने मोठा फौज फाटा घेवून जात ही कारवाई केली.आदिवासींनी लावलेल्या ४०० एकरावर लावलेली पिके ११ जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करत नष्ट करण्यात आली.यात जवळपास ३०० आंबे तसेच चिकूचीही झाडे जमीनदोस्त झाली आहेत.
गेल्या आठवड्यात अशाच पध्दतीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी यावल तालुक्यातील सावखेडा येथील २३ शेतकऱ्यांच्या ९० एकरावरील मका व सोयाबीन पिकांवर जेसीबी फिरवून ते नष्ट केले होते.तर रावेर तालुक्यात वर्षभरात वनविभागाने केलेली ही तिसरी कारवाई आहे.या सर्व आदिवासी शेतकऱ्यांचे दावे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्याबाबतची संपूर्ण प्रशासकीय कारवाई सुध्दा पूर्ण झालेली आहे.वनविभाग कायद्यातील तरतुदी तसेच संबंधितांचे वनदावे व पुरावे यानुसार त्यांच्यावर कारवाई करु नये असे जिल्हाधिकारी यांचे आदेश आहेत.या आदेशाला केराची टोपली दाखवत वनविभागाने ही कारवाई केली असून संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच संबंधित आदिवासी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी व पुन्हा वनविभागाने वनदावे दाखल केलेल्या आदिवासी शेतकऱ्यांवर अशा पध्दतीने कारवाई करु नये अशी मागणीही प्रतिभा शिंदे यांनी प्रशासनाकडे केली आहे.