यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ ऑक्टोबर २३ शनिवार
नुकत्याच होऊ घातलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रणशिंग फुंकण्यात आले असून यानिमित्ताने वंचित बहुजन आघाडीतर्फे तालुक्यातील किनगांव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजकारण्यांना शह देत सरपंच व सदस्य निवडणुकीसाठी आपल्या परीने उमेदवारी अर्ज नुकतेच दाखल करण्यात आले आहे.
तालुक्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका या प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या असून अनेक राजकीय व्यक्ती मोर्चेबांधणीच्या कामाला लागले आहेत.अशात वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकांमधून आपली ताकद दाखवून देण्याकरिता हीच नामी संधी चालून आलेली असल्याने तालुक्यात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याकरिता तालुकाध्यक्ष भगवान मेघे यांनी खूणगाठ बांधल्याचे दिसून येत आहे.यात तालुक्यातील किनगाव येथील अनेक रथी महारथी राजकारण्यांना शह देत येथील ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रणनीती आखून सरपंच व सदस्य पदाकरिता आपले उमेदवार जाहीर करण्यात आले होते.सदरील निश्चित करण्यात आलेल्या उमेदवारांचे वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज नुकतेच भरण्यात आले.यात सरपंच पदाकरिता हसिना गफूर तडवी,सदस्य पदासाठी संतोष जगन्नाथ तायडे,प्रतिभा अमोल कोळी (एसटी),अनिता दिलीप वानखेडे (सर्वसाधारण),कल्पना रतन वानखेडे (एससी) यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी यावल तालुकाध्यक्ष भगवान मेघे,कामगार युनियन यावल तालुकाध्यक्ष भुषण साळुंके,राजेंद्र बारी,कामगार आघाडीचे बाबुलाल पटेल,भूषण अडकमोल,भानदास महाजन,किनगाव शहराध्यक्ष रोहन निकम,वंचित शाखा अध्यक्ष भूषण अडकमोल यांच्यासह वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.