अमळनेर तालुका (प्रतिनिधी) :-
दि.२९ ऑक्टोबर २३ रविवार
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा आज दि.२९ ऑक्टोबर रविवार रोजी करण्यात आली असून संमेलनाचे निमंत्रक म्हणून मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची तर प्रमुख संरक्षक व सल्लागार म्हणून पाणी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नावाची घोषणा मराठी वाड्मय मंडळ अमळनेरचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी केली आहे.
मराठी वाङ्मय मंडळ अमळनेर द्वारा आयोजित ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि.२, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळेनर येथील पू.साने गुरूजी साहित्य नगरी प्रताप महाविद्यालयात होत आहे.संमेलन अध्यक्षपदी प्रा.डॉ.रविंद्र शोभणे यांची निवड करण्यात आली असून संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे.दरम्यान संमेलन स्वागताध्यक्षपदी मंत्री गिरीश महाजन,संरक्षक व सल्लागार म्हणून गुलाबराव पाटील व निमंत्रक म्हणून अनिल पाटील यांची निवड करण्यात आली आहे.याबाबत मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ मुंबईच्या अध्यक्षा उषाताई तांबे यांना पत्र पाठविले आहे.दरम्यान जिल्ह्यातील तिन्ही कॅबिनेट मंत्र्यांसोबत एकत्रित बैठक घेऊन चर्चा करण्यात आली व त्यानुसार स्वागताध्यक्ष,संरक्षक व निमंत्रक यांची निवड करण्यात आली असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे अशी माहिती मराठी वाड्मय मंडळाचे उपाध्यक्ष रमेश पवार यांनी दिली आहे.
दरम्यान संमेलनाचे इतर पदाधिकारी आणि विविध समित्यांची निवड आठवडाभरात करण्यात येणार असून त्यांच्यावर जबाबदारी देखील सोपवण्यात येणार असल्याची माहिती मराठी वाड्मय मंडळाने दिली आहे.यासंदर्भात २ नोव्हेंबर रोजी साने गुरुजी हायस्कूल अमळनेर येथे साहित्य क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची हितगुज सभा दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली आहे.संमेलन अध्यक्ष प्रा.डॉ.रविंद्र शोभणे यांनी प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे नुकतीच भेट देऊन पाहणी केली त्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही प्रताप महाविद्यालयात आढावा बैठक घेऊन समित्या,सुख सुविधा,सुशोभीकरण तसेच लागणाऱ्या गरजा आदींबाबत चर्चा केली होती.आता साहित्य संमेलनाच्या प्रमुख पदांवर जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांची निवड झाल्याने संमेलन यशस्वी करण्यासाठी गती मिळेल असा विश्वास मराठी वाड्मय महामंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी,उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे,रमेश पवार,कार्यवाह सोमनाथ ब्रह्मे,नरेंद्र निकुंभ,शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी,सदस्य प्रा.डॉ.पी.बी.भराटे,बन्सीलाल भागवत,स्नेहा एकतारे,संदीप घोरपडे,वसुंधरा लांडगे,भैय्यासाहेब मगर,प्रा.डॉ. सुरेश महेश्वरी,प्रा.श्याम पवार,प्रा.शीला पाटील,अजय केले,बजरंगलाल अग्रवाल,हेमंत बाळापूरे यांनी व्यक्त केला आहे.